मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्व व अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे रेटला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. ‘अच्छे दिन’ही आले नाहीत आणि राम मंदिरही उभारले नाही, यावर शिवसेनेचा भर असणार आहे. स्वत: उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असून अयोध्यावारीची तारीखही मेळाव्यात जाहीर केली जाऊ शकते. सत्ता मिळाल्यावर मात्र भाजपा हिंदुत्वाच्या मुद्यापासून दूर गेल्याचे चित्र शिवसेनेला उभे करायचे आहे. मात्र शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची कोणतीच शक्यता नाही.मेळाव्यात शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे स्वत: मेळाव्याच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ‘जय श्रीराम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:41 AM