मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खुद्द राष्ट्रवादीला देखील त्यांच्या भाजप प्रवेशाचा धक्का बसला आहे. उदयनराजे यांच्या निर्णयाने भाजपचा फायदा आणि राष्ट्रवादीला धक्का बसला असला तरी नुकसान तर शिवसेनेचेच होणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी राष्ट्रवादीकडून विजय मिळवला होता. त्यावेळी ही जागा युतीकडून शिवसेनेने लढवली होती. साताऱ्याची जागा आधीपासूनच शिवसेनेकडे आहे. मात्र आता उदयनराजे भाजपमध्ये आले म्हटल्यावर शिवसेनेला ही जागा भाजपसाठी सोडवी लागणार आहे. अर्थात लोकसभेला लढविण्यासाठी मिळणाऱ्या जागांपैकी शिवसेनेची एक जागा कमी होणार आहे. हे शिवसेनेचे एकप्रकारे नुकसानच आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी लढवली होती. त्यात त्यांना ४ लाखांहून अधिक मते मिळाली होती. आता उदयनराजे भाजपमध्ये आल्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. एकूणच या जागेवर युती काय तोडगा काढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तत्पूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजे यांच्यावर शिवसेनेने आग्रलेखातून टीका केली आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते, तर उदयनराजेंनी दिल्लीतील हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपाचा रस्ता पकडला, असे म्हणत उदनयराजेंच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने फिरकी घेतली आहे. उदनयराजेंनी भाजप प्रवेशावेळी कॉलर उडवली नसल्याचा दाखलाही सामनातून देण्यात आला आहे. एकूणच नुकसान होणार असल्यामुळे तर शिवसेनेकडून उदयनराजे यांच्यावर टीका करण्यात आली का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.