कोल्हापूर : मुंबईपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील केवळ कोल्हापूर जिल्ह्याने १० पैकी ६ शिवसेनेचे आमदार निवडून दिले असतानाही हुलकावणी दिलेले मंत्रिपद आता मिळेल असे वातावरण तयार झाले आहे. या मंत्रिपदाची चर्चा जोरदारपणे सुरू झाली असून आता ज्याने त्याने आपापल्यापरीने ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या झेंड्याखाली सर्वपक्षीयांना एकत्र आणत सत्तास्थाने काबीज करायला सुरुवात केली आहे ते पाहता कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेकडून मंत्रिपद नक्कीच दिले जाईल, असे मानले जाते. आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर आणि उल्हास पाटील हे सहा शिवसेनेचे आमदार कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यातीलच असंतुष्टांना हाताशी धरून शिवसेनेने जी अभूतपूर्व कामगिरी केली त्याचा हेवा अन्य पक्षांनाही वाटल्याशिवाय राहत नाही हे वास्तव आहे. मात्र, तरीही अडीच वर्षे झाली तरी जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेले नाही. एकापेक्षा एक सरस आमदार असल्याने पक्षप्रमुख निवडीसाठी कोणता निकष लावणार हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर शहरातून नेतृत्व करतात. सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन करीत संघटनेसाठी कोणतीही टोकाची भूमिका घेणारा बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा पाईक अशी प्रतिमा निर्माण करण्यात क्षीरसागर यांना यश आले आहे. चंद्रदीप नरके हे एका साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. चांगले शिक्षण, संयमी वर्तणूक, अभ्यासू प्रतिमा आणि सहकारातील जाण या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. शिवसेनेमध्ये सहकारी संस्थांचे जाळे असणारे कमी नेते आहेत, परंतु एक कारखाना, बँक गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे नेतृत्व म्हणून नरके यांच्याकडे पाहिले जाते. सत्यजित पाटील यांनी आपल्या भागात शिवसेनेचे बस्तान बसवताना विनय कोरे यांच्याशी सातत्याने लढत दिली आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून त्यांचा गावागावांत चांगला संपर्क आहे. सुजित मिणचेकर यांचे नाव पहिल्यापासून मंत्रिपदासाठी चर्चेत होते. ‘शिवसेनेतील मागासवर्गीयांचा चेहरा’ असल्याने मिणचेकर यांना संधी मिळेल असे वातावरण तयार झाले होते. मात्र, ते वास्तवात येऊ शकत नाही. आमदार प्रकाश आबिटकर आणि आमदार उल्हास पाटील हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद निवडीचे पडसादनुक त्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीमध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर कोल्हापुरात ठिय्या मारून बसले. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावे यासाठी जोरदार नियोजन करण्यात आले; परंतु आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर आणि शेवटच्या टप्प्यात सत्यजित पाटील हे भाजपसोबत गेले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे समजते. याबाबतचा अहवालही जिल्हा प्रमुखांनी पाठविला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपद देणार का आणि दिले तर नेमके कुणाला याची उत्सुकता मात्र शिवसैनिकांना लागून राहिली आहे.
कोल्हापुरात शिवसेनेच्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा
By admin | Published: April 05, 2017 12:51 AM