मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांना भविष्याचा वेध घेत पक्षांतराला प्राधान्य दिले. त्यामुळे दिग्गज नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. भाजप-शिवसेनेने देखील पक्ष विस्तार करण्याच्या इराद्याने या नेत्यांना पक्षात संधी दिली. तर काहींना मंत्रीपदही दिले. आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप-शिवसेनेच्या इराद्याला सुरुंग लागल्याचे चित्र आहे.
बीड जिल्ह्यात शिवसेनेचे बस्तान बसविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अनेक वर्षे मंत्री राहिलेले जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेत सामील करून घेतले. एवढंच नाही तर क्षीरसागर यांना मंत्रीपदही दिले.
अखेरच्या सहा महिन्यांत त्यांना विधान परिषदेवर न घेता मंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे बीड जिल्ह्यात शिवसेनेचं खातं उघडणार अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र शरद पवार यांनी बीड मतदार संघातून जयदत्त क्षीरसागर यांच्या पुतण्याला बळ देऊन जयदत्त यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले.
पुतण्या संदीप क्षीरसागरने काकांविरुद्ध चिवट झुंज देत निसटता विजय मिळवला. संदीप यांनी विद्यमान मंत्र्यांना पराभूत करत बीड मतदार संघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. मात्र क्षीरसागरांच्या पराभवामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. जयदत्त यांच्या पराभवाने बीड जिल्ह्यात पक्ष विस्तार करण्याच्या शिवसेनेच्या योजनेला खीळ बसली आहे.