ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवर येऊन आज दोन वर्ष होत असतानाच भाजपा व त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा 'पोस्टरवॉर' भडकले आहे. 'मुंबईतले वाघ संपले असून आता गल्ली गल्लीत फक्त सिंह दिसेल' असे वक्तव्य करत शिवसेनेवर निशाणा साधणारे भाजपाचे मंत्री प्रकाश मेहतांवर शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून पलटवार केला आहे. प्रकाश मेहतांचा मतदारसंघ असलेल्या घाटकोपर पूर्व भागात शिवसेना नेत्यांतर्फे मेहतांविरोधात एक पोस्टर लावण्यात आले असून मेहता यांची तुलना माजलेल्या बोक्याशी करण्यात आली आहे.
'माजलेला हा बोका स्वत:ला सिंह समजतो काय? या नकली सिंहाचा बुरखा आता फाडावाच लागेल' असे या पोस्टवर लिहीले असून मेहता यांना बोक्याच्या रुपात दाखवण्यात आहे. घाटकोपरमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ही पोस्टर्स लावत मेहतांना चांगलाच दणका देत मुंबईत शिवसेनाच खरा वाघ असल्याचे ठसवण्याचाही प्रयत्न केला आहे.
एवढेच नव्हे तर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या आजच्या अंकातील पहिल्याच पानावर 'वाघ एकला राजा!' या कॅप्शनसह आफ्रिकेच्या जंगलातील वाघ-सिंहाच्या थरारक झुंजीचा फोटो छापण्यात आला आहे. ' वाघाचा इलाखा असतो, या इलाख्यात कोणी घुसायचे नसते, मग भले तो सिंह असेल, वाघ त्याच्या नरडीचा घोट घेतोच. कारण इथे राज्य वाघाचे, सत्ता वाघाची आणि दराराही फक्त वाघाचाच! ' असेही त्यात लिहीण्यात आले असून त्या फोटोचा इशारा अप्रत्यक्षपणे मेहता यांच्याकडेच असल्याची चर्चा आहे.
खरतर केंद्र व राज्याच्या सत्तेत एकत्र असणा-या भाजपा-शिवसेनेच्या कुरबूरी काही नवीन नाही. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी कधीच सोडत नाही. त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना व भाजपमधे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा खटके उडत असून काही दिवसांपूर्वीच प्रकाश मेहतांनी केलेले 'वाघ-सिंहाचे' वक्तव्य सेनेला चांगलेच झोंबले असून त्यांनी या पोस्टरमधून प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील हा वाद आता आणखी काही दिवस धुमसतच राहणार यात शंका नाही
काय म्हणाले होते प्रकाश मेहता?
मुंबईतले वाघ संपले असून आता गल्लीगल्लीत फक्त सिंह दिसेल, असं वक्तव्य करुन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. कर्नाक बंदर चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मेक इन इंडिया’चं प्रतिक असलेल्या सिंहाचं अनावरण करण्यात आलं. त्याचवेळी मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच सेनेला टोला लगावला.
यापूर्वीही मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनीही शिवसेनेच्या महापालिकेतील कारभारावर टीका करून संशयाचे वादळ माजविले होते.