मुंबई - जे सकाळी उठल्यापासून घोडेबाजार, घोडेबाजार असं स्वप्न पडल्यासारखं करतात ते तबेल्यात राहत असतील. भाजपाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. शिवसेनापेक्षा मूळ पक्षाची जादाची मते भाजपाकडे आहे. राज्यसभेची निवडणूक शिवसेनेने लादली असा टोला भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. त्याचसोबत शिवसेनेच्या संजयचा पराभव होणार असा दावाही शेलारांनी केला.
केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यसभा निवडणुकीबाबत बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस ऑनलाईन उपस्थित होते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भाजपाचा तिसरा उमेदवार जिंकणार आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होणार असा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला.
आशिष शेलार(BJP Ashish Shelar) म्हणाले की, पक्षाच्या आमदारांना नजरकैदेत ठेवण्याची वेळ महाविकास आघाडीवर का आली? आमदारांवर विश्वास नसल्याचं चित्र समोर येते. स्वपक्षीय आमदारांना नजरकैदेत ठेवले जाते. संजय राऊत बालिशपणाचे, पोरकटपणाचे विधान करतात. कुठल्या केंद्रीय यंत्रणेचा उपयोग या निवडणुकीत होतोय याचा पुरावा त्यांच्याकडे नाही. कदाचित स्वत:चा पराभव दिसत असल्याने त्याची कारणमीमासा करण्याचं ते काम करत आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच कोल्हापूरातील त्यांचे आमदार सतेज पाटलांनी सांभाळले तरी पुरेसे आहेत. दुसऱ्यावर दोष देण्याआधी स्वत:च्या आमदारांना नजरकैदेत ठेवावं लागतं. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचं पाप करणारे लोकशाहीवर बोलतात. आजपर्यंत कुठल्याही पक्षाने आमदारांचा इतका अपमान केला नाही. शिवसेनेचे आमदार उघड बोलत आहेत. कुठल्या संजयचा पराभव होणार आहे असं सांगत आशिष शेलारांनी गुगली टाकली आहे.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी मतदानराज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडे २, शिवसेना १, काँग्रेस १, राष्ट्रवादी १ असे उमेदवार निवडून येण्याइतपत संख्याबळ आहे. मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. यात भाजपाकडे जादाची ३० मते असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर शिवसेनेनेही आपला उमेदवार निवडून येईल इतके संख्याबळ आहे असं सांगितले आहे. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी चुरशीची लढाई आहे.