खातेवाटप जाहीर : महत्त्वाची खाती विदर्भाकडे
मुंबई : शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेत भाजपाने आपले सरकार बहुमतात आणले, पण त्याचवेळी खातेवाटप करताना शिवसेनच्या हातावर दुय्यम खाती टेकवून मंत्रिमंडळावर आपले वर्चस्व कायम ठेवले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खातेवाटप जाहीर केले. आधीच्या 1क् मंत्र्यांपैकी प्रकाश महेता यांच्याकडील उद्योग खाते आता सेनेचे सुभाष देसाई यांच्याकडे गेले असून महेता यांना गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार ही खाती देण्यात आली. विदर्भातील मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती देण्यात आली. स्वत: मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, गृह, विधी व न्याय यांच्यासह आठ विभाग, तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वित्त, नियोजन आणि वने ही खाती आहेत. नागपूर जिल्ह्यातील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा तर गोंदिया जिल्ह्यातले राजकुमार बडोले नवे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री असतील.
गृह विभागाला दोन राज्यमंत्री असतील. गृहराज्यमंत्रिपद (शहरे) अकोल्याचे डॉ. रणजित पाटील यांच्याकडे, तर ग्रामीणचे गृह राज्यमंत्रिपद अहमदनगरचे राम शिंदे यांच्याकडे असेल. संजय राठोड (महसूल), प्रवीण पोटे (उद्योग, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम), अंबरीश राजे आत्रम (आदिवासी विकास) या विदर्भातील राज्यमंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळाली. मुंबईतील मंत्र्यांमध्ये विनोद तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य ही खाती कायम ठेवण्यात आली. तर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांना उद्योग, दिवाकर रावते (परिवहन) अशी खाती मिळाली. सांसदीय कार्यमंत्री पदाची जबाबदारी ज्येष्ठ सदस्य गिरीश बापट यांच्याकडे तर अन्न व नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासन अशी एकत्रित खाती बापट यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडील ग्रामविकास, रोहयो आणि महिला व बालकल्याण ही खातीे कायम ठेवण्यात आली आहेत. (विशेष प्रतिनिधी)
रामदास कदम नाराज
इतर खात्यांच्या मानाने तसे दुय्यम असलेले पर्यावरण खाते मिळाल्यामुळे रामदास कदम नाराज असल्याचे समजते. त्यांना रावतेंकडील परिवहन खाते हवे होते, असे कळते. एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक उपक्रम (एमएसआरडीसी), तर डॉ. दीपक सावंत यांना आरोग्य खाते मिळाले आहे.
च्संजय राठोड (महसूल), दादा भुसे (सहकार) या शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना एकेकच विभाग मिळाला. मात्र विजय शिवतारे यांना जलसंपदा व जलसंधारण, दीपक केसरकर यांना वित्त व ग्रामविकास तर रवींद्र वायकर यांना गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण ही खाती मिळाली. शिवसेनेकडून आणखी दोन राज्यमंत्री घेतले जाऊ शकतात. त्या वेळी विद्यमान राज्यमंत्र्यांकडील काही खाती त्यांच्याकडे जातील.
मुख्यमंत्र्यांची छाप : मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुचविलेले खातेवाटप जसेच्या तसे पक्षश्रेष्ठींनी स्वीकारले, अशी माहिती आहे. श्रेष्ठींनी त्यांना मंत्री आणि खाती ठरविताना स्वत:ची टीम बांधण्याची मुभा दिली. भाजपाच्या सर्व मंत्र्यांचा कारभार पारदर्शक राहील, याची खबरदारीही फडणवीस यांना घ्यावी लागेल.