- मनोहर कुंभेजकरमुंबई- येत्या 25 जून रोजी विधान परिषदेच्या होणाऱ्या शिक्षक मतदार निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती आखली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा.शिवाजी शेंडगे यांना निवडून आणण्याचा ठाम निर्धार शिवसेनेने केला आहे. आज दुपारी सेनाभवनात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची महत्वाची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. यावेळी शिक्षक मतदार निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रा. शेंडगे यांना विजयी करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नगरसेवकांना कानमंत्र दिला.शिवसेना प्रथमच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत असून, मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये असलेली शिक्षकांची मते शिवसेनेलाच मिळण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी प्रत्येक शिक्षकांच्या घरी जाऊन थेट संपर्क साधावा. शिवसेनेचा शिक्षक उमेदवार आमदार म्हणून निवडून आल्यावर त्याच्या मागे शिवसेनेची ताकद असल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न शिवसेना चांगल्या प्रकारे सोडवू शकेल, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की,माझ्या सारख्या शिक्षकाला उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे महापौर केले.शिक्षक मतदार संघात शिक्षक हाच उमेदवार असावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रा.शेंडगे यांना या निवडणुकीत उभे केले. मुंबईतील तमाम शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या हक्काच्या उमेद्वाराला निवडून देण्यासाठी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी जातीने लक्ष घालून मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये असलेल्या शिक्षक मतदारांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार अनिल देसाई,आमदार प्रकाश सुर्वे, उपमहापौर हेमांगी वरळीकर,सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
शिक्षक मतदार निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती, उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 9:14 PM