ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - शिवसेनेनं एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएसोबत आहे. मोहन भागवत यांना आजही आमची पसंती आहे, असंही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कोविंद यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील भाजपासमोरील मोठा अडथळा दूर झाला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देईल, असे जाहीर केले. " प्रत्येक वेळी भाजपाला विरोध करावा, अशी आमची भूमिका नाही. भाजपाची कृती जिथे पटणार नाही तिथेच आम्ही विरोध करू, आम्ही रामनाथ कोविंद यांच्याविषयी माहिती घेतली. त्यांचे व्यक्तिमत्त्व चांगले असून संघर्ष करून ते पुढे आले आहेत. आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जातीचे राजाकरण होऊ नये," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉ. स्वामिनाथन यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली होती. मात्र वयोमानामुळे त्यांच्या नावाबाबत फार काही होऊ शकले नाही. आता भाजपाने उमेदवार जाहीर केला आहे. त्यांनी निवडून आल्यावर देशहिताचे काम करावे," अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेसुद्धा उपस्थित होते. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली होती. या बैठकीचा सविस्तर तपशील उघड झाला नव्हता. तरी सरसंघचालक मोहन भागवत किंवा डॉ. स्वामिनाथन यांना एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी शहांकडे केल्याचे समजले होते.