नाशिक : मी देखील २१ तारखेची वाट बघतोय, मी आज नाशिक जिंकायला आलोय आणि शिवसेनेची ‘वाट’ लावणारा अजुन जन्माला आला नाही. ‘अच्छे दिन’ सारखे स्वप्न दाखविण्याचे काम शिवसेनेने कधीही केले नाही आणि करणारही नाही, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या विक ासाचा धागा धरून मी कोणत्याही राजकारणासाठी येथे आलो नाही. यापुर्वी जेव्हा नाशिकमध्ये आमची सत्ता होती तेव्हा आम्ही नाशिकमध्ये विकासकामे करुन दाखविली असून ती जनतेपुढे आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की नाशिककर पुन्हा महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवतील. जे करायचे तेच बोलायचे, हे शिवसेनेचे धोरण असून या धोरणाशी शिवसेना नेहमीच बांधील आहे. निवडणूक प्रक्रिया काळात थोडी घाईगडबड झाली म्हणून काही प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवारांना पुरस्कृत म्हणून रिंगणात उतरावे लागले. जेव्हा वेळ येईल, असे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही खिशातला राजीनामा काढून देण्याची धमकही दाखवू इतरांना घाई कशासाठी? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मी ‘सामना’मध्ये लिहितो म्हणजे मी रिकामा म्हणून लिहित नाही. नोटाबंदीमुळे देशात भयावह वातावरणनिर्मिती झाली असून आपल्याच देशाला धमकी देणारा पंतप्रधान मी पहिल्यांदाच बघितला असा निशानाही ठाकरे यांनी मोदींवर साधला. सगळ्या गुंडांची यादी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून मागितली आणि या गुंडांना तुरूंगात डांबण्याऐवजी थेट पक्षाच्या ‘स्टेज’वर नेऊन बसविले असा टोला ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला. शिवसेनेत असलेले गुंड होऊ शकत नाही ते शिवसैनिक आहे, असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. देवेंद्र सरक ारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी कारण हा त्यांचा हक्कच आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आशेने बॅँकांत खाती उघडायला लावली, पण टाकले का त्यांच्या खात्यात १५ लाख ? असा सवाल त्यांनी सभेत उपस्थित केला. भाजपा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आणि पुढील कर्जावरी व्याजही माफी दिली तर भाजपाला माझा पाठिंबा असेल, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेनेची ‘वाट’ लावणारा अजून जन्माला आला नाही! उध्दव ठाकरे
By admin | Published: February 16, 2017 9:45 PM