ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 16 - केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. नोटबंदीच्या निर्णयाला विरोध दर्शवण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे.
याचाच एक भाग म्हणून सोलापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नोटबंदीविरोधात अनोखे आंदोलन केले.
बँक, एटीएम सेंटरबाहेर रांगेत उभ्या राहणा-या नागरिकांना पाय, कंबर, पाठदुखीचा त्रास होत असल्याने शिवसेनेने त्यांना झंडू बामचे वाटप करुन केंद्र सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले. याद्वारे शिवसेना केंद्राच्या नोटबंदी निर्णयाची खिल्ली उडवत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडून बुधवारी शहरातील लकी चौकातील 'बँक ऑफ इंडिया'च्या शाखेसमोर रांगेत उभे असलेल्या ग्राहकांना झंडू बाम वाटप करण्यात आले. शिवसेनेचे शहर प्रमुख प्रताप चव्हाण आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
'अचानक घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. एवढेच नाही तर जुन्या नोटा बदलण्यासाठी लोकांचा संपूर्ण दिवस खर्च होत आहे. कोणतेही नियोजन न करता मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. निर्णय चांगला आहे मात्र त्याची अंमलबजावणी नीट होत नाही', अशी टीकादेखील शिवसेनेने यावेळी केली आहे.
रांगेत उभे राहून नागरिकांना पाय, कंबर आणि पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. जनतेला त्रास होत असल्याने नोटबंदीविरोधात प्रतिकात्मक आंदोलन करुन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष्य वेधवण्याचा प्रयत्न केला, असे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रताप चव्हाण यांनी सांगितले.
8 नोव्हेंबर रोजी देशातून 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे तेव्हापासून ते आजपर्यंत बँकांबाहेर, एटीएम सेंटरबाहेर पैशांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची झुंबड उडत आहे. दिवसरात्र, भर उन्हात रांगेत उभे राहिल्यामुळे नागरिकांना शारीरिक समस्या उद्धभवू लागल्या आहेत. याशिवाय दैनंदिन जीवनातील अन्य गंभीर समस्यादेखील निर्माण होऊ लागल्या आहेत.