मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या खर्चात तब्बल 1 हजार कोटींची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अद्याप शिवस्मारकाचं कामदेखील सुरू झालेलं नाही. याचमुळे शिवस्मारकाच्या खर्चात 1 हजार कोटींनी वाढ झाली आहे. शिवस्मारकाच्या उभारणीसाठी 2 हजार 692 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र आता डेडलाईन पुढे गेल्यानं हा खर्च 3 हजार 643 कोटींवर जाऊन पोहोचला आहे. शिवस्मारकाच्या कामाला विलंब होत असल्यानं खर्चात मोठी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2013 पासून शिवस्मारकाची चर्चा सुरू झाली. स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी 36 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. यानंतर शिवस्मारकाच्या निर्मितीसाठी अंदाजित खर्च 2 हजार 692 कोटी रुपये इतका धरण्यात आला होता. मात्र अद्यापही शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या काळात शिवस्मारकाच्या खर्चाच्या 1 हजार कोटींची वाढ झाली आहे. हा खर्च आता 3 हजार 643 कोटी रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे स्मारकाच्या भूमिपूजनावरच आतापर्यंत 8 कोटींचा खर्च झाला आहे. शिवस्मारकाच्या खर्चात आतापर्यंत 1 हजार कोटींची वाढ झाली आहे. स्मारकाचा बांधकाम खर्च 309 कोटी 72 लाख रुपयांनी वाढला आहे. तर सुरक्षा (236 कोटी), पाणी आणि वीज (45 कोटी), आकस्मिक निधी (112 कोटी), संगणकीकरण (56 कोटी) यांच्याही खर्चात वाढ झाली आहे. शिवस्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी जलपूजन केलं होतं. यानंतर दोनच महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भूमिपूजनाचं आयोजन केलं होतं. मात्र या कार्यक्रमासाठी गेलेली एक बोट पाण्यात बुडाली आणि त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मात्र अद्याप या अपघाताची चौकशी पूर्ण झालेली नाही.
एकही वीट न रचता शिवस्मारकाच्या खर्चात 1000 कोटींची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 5:26 PM