- चंद्रशेखर बुऱ्हांडेप्रागैतिहासिक वास्तू, कोणत्याही देशासाठी सार्वजनिक ठेवा असतात. स्मारके भूतकाळ व भविष्यकाळातील दुवा साधण्याचे व पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शकाचे काम करतात. जगभरात ऐतिहासिक, सांस्कृतिक व राजकीय अशा निरनिराळ्या क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेल्या थोर व्यक्तींची स्मारके उभारण्याची प्रथा आहे. सतराव्या शतकातील, ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ हे फ्रान्स व अमेरिका या दोन देशांतील मैत्रीचे प्रतीकात्मक स्मारक म्हणून जगभर प्रसिद्ध आहे, तसेच स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत अध्यात्माच्या निकषांवर हिंदू धर्माचे महत्त्व व श्रेष्ठत्व जगाला पटवून दिले. त्यांच्या आध्यात्मिक योगदानाचे प्रतीक म्हणून कन्याकुमारी येथे ‘विवेकानंद स्मारक’ उभे राहिले. अठराव्या शतकातील प्रगत इंजिनीअरिंग तंत्रज्ञानाचे प्रतीक म्हणून ‘आयफेल टॉवर’कडे बघितले जाते. पहिल्या महायुद्धातील योद्ध्यांच्या स्मरणार्थ एकट्या फ्रान्समध्ये १७,९०० स्मारके बांधली गेली, हे जगातील एकमेव उत्कृष्ट उदाहरण आहे.सर्वात जास्त किल्ले असलेले महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. ३५० पुरातन किल्ल्यांपैकी काही किल्ले आजही सुस्थितीत आहेत. यावरून आपल्या पुरातन स्थापत्याच्या भरभक्कमतेची कल्पना येऊ शकते, एवढेच नव्हे तर इतर देशांच्या तुलनेत आपल्या ऐतिहासिक स्थापत्याचा दर्जा किती प्रगत होता हेही समजण्यास मदत होते.सतराव्या शतकापासून भारतात राष्ट्रघडणीला सुरुवात झाली असे म्हणतात आणि तो काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा! देशभर हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय उराशी बाळगून महाराज आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले. महाराज व किल्ले या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. त्यांनी परकीय राजवटीशी दिलेला राजकीय लढा किल्ल्यांशिवाय अपुरा आहे. महाराजांनी स्वत: बांधलेले व काही लढून जिंकलेले किल्ले त्यांना जीव की प्राण होते. जेव्हा आपण भारतातील मध्ययुगीन ऐतिहासिक राज्यकर्त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतो, तेव्हा महाराजांचे नाव प्रामुख्याने पुढे येते, म्हणून त्यांचे भव्य स्मारक होणे गरजेचे आहे. अशा थोर पुरुषाने केलेल्या गौरवशाली कार्याचे प्रतीक ठरवणे, देश-परदेशातील पर्यटकांसमोर ती संकल्पना मांडणे किंवा त्या प्रतिमेस लोकांच्या मनातील चौकटीत फिट्ट बसवणे व लोकांना त्यांनी केलेल्या कार्याचा अभिमान वाटेल, असे प्रतीकात्मक स्मारक उभे करणे हे रचनाकारासाठी आव्हान असते! हे स्मारक कुठे असावे, कसे असावे? याविषयी अनेकांची वेगवेगळी मते आहेत.किल्ले महाराजांच्या जिवाचा अविभाज्य घटक होते. ज्याप्रमाणे किल्ले महाराजांपासून वेगळे करता येत नाहीत त्याचप्रमाणे किल्ल्यांच्या संवर्धनाशिवाय उद्याचे स्मारक अपुरे असेल! महाराजांचे स्मारक पूर्ण होण्याअगोदर त्यांच्या नजरेतील अतिमहत्त्वाच्या मोजक्या किल्ल्यांचे संवर्धन करून ते किल्ले ‘स्मारक पर्यटन योजने’त जोडले गेले तर ते जगातील सर्वात मोठे नावीन्यपूर्ण कार्य ठरेल! पुनर्संचयित गड-किल्लेच महाराजांच्या स्मारकाचे प्रथम साक्षीदार ठरतील! आणि अशा प्रकारचे स्मारक असलेले महाराष्ट्र हे भारतातील एकमेव गौरवशाली राज्य असेल आणि जर का असे घडले नाही तर प्रस्तावित स्मारकाचा हेतूच साध्य झाला नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. एकेकाळी आपल्या पूर्वजांनी राज्याच्या संरक्षणासाठी बांधलेले किल्ले पडझडीमुळे नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पिढ्यान्पिढ्या चालत आलेला ऐतिहासिक वारसा आपण घेतला खरा; परंतु या किल्ल्यांच्या संवर्धनाचे मार्ग शोधण्यावाचून आपले काहीच अडत नसल्याचे दर्शवून दुर्लक्ष करायचे व नको तेव्हा पोकळ अभिमान दाखवायचा हे दुटप्पी धोरण सोडून द्यायला हवे. सुस्थितीतील किल्ल्यांच्या भविष्याविषयी शंका असण्याचे काहीच कारण नाही. यापुढेही टिकून राहण्याची क्षमता या त्यांच्या बांधकाम पद्धतीत आहे. गरज आहे ती योग्य संवर्धन व काटेकोर संरक्षणाची. पुरातन वास्तूंची किरकोळ डागडुजी वा पूर्णत: संवर्धन व संरक्षण करण्याचे अधिकार कायद्यानुसार फक्त पुरातत्त्व खात्याकडेच असतात; परंतु या खात्याची यंत्रणा सर्व बाबतीत आजही अपुरी आहे हे आपले दुर्दैव आहे. अशा परिस्थितीत ऐतिहासिक वास्तुवारशाचे दीर्घकालीन संवर्धन व खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी नेमके कोणते धोरण रास्त ठरेल हे विचारात घ्यायला हवे.
माझ्या मनातले शिवस्मारक
By admin | Published: February 19, 2017 2:33 AM