ऑनलाइन लोकमत
कडेगाव, दि. 29 - चिंचणी येथील शिवप्रतिष्ठानच्या १७ जिगरबाज तरुणांनी आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापासून चिंचणीतील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत तब्बल ७०० किलोमीटर धावत अक्षयतृतीयेस शिवज्योत आणली. यामध्ये अक्षय बाबासाहेब पाटोळे नावाचा २० वर्षांचा तरुण एकटा तब्बल २५१ किलोमीटर अंतर टप्प्याटप्प्याने धावला.
चिंचणी येथे अक्षयतृतीयेस शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी श्रीशैलम येथून शिवज्योत आणण्याचे ठरले. त्यानुसार १७ कार्यकर्ते रवाना झाले होते. सुमारे ७०० किलोमीटरचे दीर्घ पल्ल्याचे अंतर सहा दिवसांत पार करण्याचे खडतर आव्हान घेऊन हे तरुण श्रीशैलम येथून २२ एप्रिलरोजी दुपारी तीन वाजता निघाले. श्रीशैलम येथून बाहेर पडताच ८० किलोमीटरचे जंगल पार करण्याचे आव्हान होते. वन्यप्राण्यांचा धोका असल्यामुळे हा जंगल रस्ता सायंकाळी सहानंतर बंद असतो.
शिवज्योत घेऊन निघालेले हे तरुण दुपारी चारच्या सुमारास जंगल रस्त्याने आत गेले. शिवज्योत घेऊन सर्वजण एकापाठोपाठ एक धावत होते. या जंगलात २० किलोमीटरचे अंतर एकट्या अक्षयने कापले. रात्र असल्याने भीती वाटत होती; परंतु तेवत राहणारी शिवज्योत धीर देत होती. ज्योत घेऊन धावणारा सोडून इतर तरुण टेम्पोमध्ये बसून विश्रांती घेत. हा टेम्पो सतत धावणाºयामागे असायचा. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या गीताने धावण्याची प्रेरणा मिळायची. अखेर रात्री अकरा वाजता ही ज्योत तेलंगणा राज्यात मेहबूबनगर येथे पोहोचली. २३ एप्रिलपासून पाच दिवस रोज १२५ किलोमीटर धावत कर्नाटकातील विजापूरमार्गे महाराष्ट्रातील जत, भिवघाट, विटामार्गे अक्षयतृतीयेस ही ज्योत चिंचणी येथे आणली.
या प्रवासात अक्षय दररोज सरासरी ४० किलोमीटर धावत होता. विजापूर शहरातून भर उन्हात अक्षय सलग २५ किलोमीटर धावला. तोएकटा तब्बल २५१ किलोमीटरचे अंतर टप्प्याटप्प्याने धावला. इतक्या दीर्घ पल्ल्यासाठी धावणे ही अक्षयची पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून येथील तरुणांनी शिवज्योत आणली होती. त्यावेळीही अक्षय २१० किलोमीटर टप्प्याटप्प्याने धावला होता. श्रीशैलम येथून शिवज्योत घेऊन येणाºया अक्षय पाटोळेसह शशिकांत पाटील, अतुल जाधव, सचिन माने, विशाल माने, खुशाल गोसावी, प्रशांत पाटोळे, ओंकार पिसाळ ,अशितोष चव्हाण, अक्षय माने, महेश पाटील, अमोल कोळी, तुषार माने, उदयसिंह पाटील, धनराज पाटील, सागर साळुंखे, संतोष सावंत यांचे चिंचणी येथील ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.
देशासाठी लढणार - अक्षय पाटोळे
अक्षयची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई-वडील मोलमजुरी करतात. तो मागीलवर्षी बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झाला आहे. पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडले. भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी आता तो कसून सराव करीत आहे. शिवचरित्रातून प्रेरणा मिळाली आणि देशासाठी लढण्याचा निश्चय केला आहे, असे त्याने सांगितले.