- रत्नपाल जाधवशहर असू दे की गाव... रस्त्यारस्त्यांवर डिझेलचा धूर ओकत जाणाऱ्या गाड्यांमुळे वाढते वायुप्रदूषण हा अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. या प्रदूषणाच्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी सरकारने विजेवर चालणारी वाहनं रस्त्यावर यावीत, यासाठी विशेष योजना आखलेली आहे. काही शहरांतर्गत विजेवर चालणारी प्रवासी बससेवा आहे. मात्र दोन शहरांमध्ये विजेवर चालणारी बस सुरू करण्याचा मान एसटीला मिळणार आहे. एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित तसेच आकर्षक रंगसंगती, अत्याधुनिक सुखसोयी असलेल्या आणि पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या ‘शिवाई’नामक १५० एसटी बस दिवाळीपूर्वी दाखल होणार आहेत. ६ सप्टेंबर रोजी याचे प्रातिनिधिक स्वरूपात मुंबईत लोकार्पण झाले असून या बससाठी केंद्र शासनाने प्रत्येकी ५५ लाख रुपये इतके अनुदान दिलेले आहे. एकदा चार्ज केल्यावर या बसेस ३०० किमी चालतील, असा अंदाज असून सुरुवातीला मुंबई-पुणे व मुंबई-नाशिक या जवळच्या शहरादरम्यान ही बस चालवली जाणार आहे. प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणाऱ्या शिवाई इलेक्ट्रिक बस मैलाचा दगड ठरतील, यात शंका नाही.रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वाहनांच्या लांबचलांब रांगा व या वाहनांच्या धुरांड्यातून डिझेलमुळे बाहेर ओकणारा जीवघेणा दूषित धूर यावर उपाय म्हणून संपूर्ण जगभरातील शहरांमध्ये या वायुप्रदूषणावर मात करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती होऊ लागली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये त्यांच्या स्वतंत्र अशा प्रवासीसेवा आहेत. या शहरांतर्गत विजेवर चालणाऱ्या बसेसची प्रवासीसेवा सुरू झाली आहे. परंतु, दोन शहरांमध्ये विजेवर चालणारी बस सुरू करण्याचा मान एसटीला मिळणार आहे. शिवनेरी, शिवशाही, विठाई या महामंडळाकडे असलेल्या आधुनिक बसेसच्या बरोबरीने आता एसटीच्या ताफ्यात शिवाई नाव परिधान केलेल्या वातानुकूलित तसेच आकर्षक रंगसंगतीने युक्त व अत्याधुनिक सुखसोयी असलेल्या १५० एसटी बस दिवाळीपूर्वी दाखल होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या सर्व बसेस पूर्णपणे विजेवर चालणाºया आहेत.वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी भारत सरकारने विजेवर चालणारी वाहने रस्त्यावर यावीत, यासाठी विशेष योजना आखलेली आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा संकल्प करून ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. विजेवर चालणाऱ्या एसटी बसचा लोकार्पण सोहळा नुकताच प्रातिनिधिक स्वरूपात ६ सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल येथे संपन्न झाला. जगभरात स्कॅनिया व व्होल्वो या नामांकित कंपन्यांही इलेक्ट्रिक बसची निर्मिती करू लागल्या आहेत. एसटीच्या ताफ्यातील शिवाई बसही मोझेव्ह या कंपनीने तयार केलेली आहे.भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या फेम-२ या योजनेंतर्गत महामंडळाने या विजेवर चालणाºया बस घेतलेल्या असून या इलेक्ट्रिक बससाठी प्रतिबस रु. ५५ लाख इतके अनुदानही केंद्र शासनाने दिलेले आहे. सदर अनुदान सध्या फक्त ५० बससाठी जरी मिळाले असले, तरी उरलेल्या १०० बससाठीही हे अनुदान मिळावे, यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे.शिवाई ही विजेवर चालणारी आधुनिक बस, हिची बाह्यरंगसंगती तर आकर्षक आहेच, पण बसच्या एकंदर बांधणीतही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. शिवाई या बसची लांबी १२ मीटर इतकी असून, रुंदी २.६ मीटर इतकी आहे व उंची ३.६ मीटर असून सदरचे इलेक्ट्रिक वाहन चालविण्यासाठी ३२२ किलोवॅट क्षमतेची लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी वापरण्यात आली आहे. या गाडीची आसनक्षमता ४३ इतकी असून सर्व आसने ही पुशबॅकपद्धतीची असल्याने ती प्रवाशांसाठी आरामदायी आहे. ३६ किलोवॅट क्षमतेची वातानुुकूलित यंत्रणा सदर बसमध्ये बसवलेली आहे. त्यामुळे प्रवासही गारेगार होणार आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर कमीतकमी ३०० किमी चालेल, असा अंदाज आहे. पण, बॅटरी चार्ज होण्यासाठी जवळपास एक ते पाच तास अपेक्षित आहेत.सुरुवातीला एकंदर रस्त्यावर होणाºया वाहतूककोंडीचा विचार करता १५० ते २०० किमी इतक्या जवळच्या मुंबई-पुणे व मुंबई-नाशिक या जवळच्या शहरांदरम्यान ही बस चालवली जाणार आहे. रस्त्यावर इंधनावर चालणाºया वाहनांमुळे होणाºया प्रदूषणावर मात करण्यासाठी इलेक्ट्रिक बस याव्यात, यासाठी खास धोरण आखलेले असून राज्य शासनाने या इलेक्ट्रिकल वाहनांसाठी जाहीर केलेल्या धोरणांतर्गत चार्जिंग स्टेशन मिळवण्यासाठी प्राप्त होणारे अनुदान मिळावे, यासाठी एसटी प्रशासन प्रयत्नशील आहे. या वाहनांना पथकरातून तसेच वाहनांच्या रजिस्ट्रेशन फीमध्येही सवलत मिळणार आहे.शिवाई ही बस २०० किमीच्या आत अंतर असलेल्या शहरांदरम्यान धावणार असून दोन लगतच्या शहरांमध्ये धावणारी पहिली इलेक्ट्रिकल बस ठरणार आहे. तर, देशातील पहिली आंतरशहर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा सन्मान एसटी महामंडळाला मिळणार आहे. शिवाई या इलेक्ट्रिक बसचे मार्ग कोणते असतील व तिचे तिकीटदर काय असतील, हे लवकरच निश्चित केले जाणार आहे. हे तिकीटदर शिवनेरी बसपेक्षा कमी पण शिवशाही बसपेक्षा थोडे जास्त असणार आहेत. सदर बसच्या चार्जिंगसाठी दिवसा रुपये सहा प्रतियुनिट व रात्री रु. ४.५ प्रतियुनिट इतक्या सवलतीच्या दराने विद्युतपुरवठा करण्यात येणार आहे. या गाडीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की, जर रस्त्यावर खूपच ट्रॅफिक असेल, तर बॅटरी व इलेक्ट्रिक मोटार यामधील सप्लाय कट होऊन बॅटरी चार्जिंगवर त्याचा परिणाम होणार नाही. आजकाल सर्वच शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसचा ट्रेण्ड येणं सुरू झालेलं आहे. विजेवर चालणाºया वाहनांचे प्रमाण वाढल्यास इंधनबचतही होईल व कर्णकर्कश आवाजही थांबले जातील.