पुणे : ''आज के शिवाजी - नरेंद्र माेदी'' या पुस्तकावरुन वाद निर्माण झालेला असताना आज उदयनराजे भाेसले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाजी महाराजांची तुलना काेणाशीच हाेऊ शकत नाही असे स्पष्ट करत त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. लाेकशाहीतील राजाने याेग्य वागले पाहिजे. शिवाजी महाराजांनी कधी स्वतःचं घर भरलं नाही. यांची संपत्ती कुठून आली, हे गर्भश्रीमंत हाेते का ? असे म्हणत उदयनराजेंनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
पुण्यात आज आयाेजित पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी अनेकांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, स्वार्थाने एकत्र आलेले फार काळ एकत्र राहत नाहीत. ज्यावेळी त्यांचा स्वार्ध साध्य हाेताे तेव्हा ते आपआपल्या मार्गाने निघून जातात, हे राज्याच्या जनतेला सांगावेसे वाटते. लाेक जेव्हा विचारांनी एकत्र येतात तेव्हा ते कायमस्वरुपी एकत्र राहतात. लाेकांना विचारांनी एकत्र आणण्याचे माझे उद्दीष्ट आहे. माझ्याकडून चुक हाेत असेल तर मला माफ करा. मला मित्र या नात्याने माझी चूक सांगा. स्वातंत्र्य मिळवून आपण काय मिळवलं ? अशी असते का लाेकशाही ? राजेशाही असती तर एकालाही उपाशी ठेवलं नसतं.
जाणता राजा फक्त शिवाजी महाराज ; उद्यनराजेंची शरद पवारांवर टीका
शिवसेनेवर टीका करताना उद्यनराजे म्हणाले, शेतकरी राज्यात आत्महत्या करत असताना तुम्ही निवडूण दिलेले जाणते राजे फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये पळवापळवी करत हाेते. ''राजा'' या नावाचा खेळखंडाेबा केला आहे. या राजकारणाची किळस वाटते. हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं, असं वाटतं. शिवसेनेतून महाराजांचं नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा. मला बघायचंय तुम्ही नाव बदलाल तेव्हा किती लाेक तुमच्या बराेबर राहतात ते. ज्या वेळेस तुम्ही नाव वापरता तेव्हा थाेडीतरी लाज राखा. महाराजांचं नाव घ्यायचे आणि जातीय दंगली घडवून आणायच्या. श्रीकृष्ण आयाेग बघा. ज्या लाेकांचे प्राण दंगलीत गेले त्या कुटुंबावर किती आघात झाले याचा विचार केलात का ? जेवढे इतिहास संशाेधक हाेते त्यांनी अभ्यास करुन 19 फेब्रुवारी तारीख सांगितली. तरी तीन वेगवेगळ्या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. किती मानहानी करणार महाराजांची. राज्यातील जनता मुर्ख नाही. शिवस्मारकाचे काय झाले ? असा सवाल देखील उदयनराजेंनी उपस्थित केला.