मुंबई : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सल्लागार चेतन पाटील यांची जामिनावर सुटका केली. तर या पुतळ्याचे शिल्पकार आणि ठेकेदार जयदेव आपटे यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी ठेवली.
नौदल दिनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर नऊ महिन्यांतच २६ ऑगस्ट रोजी पुतळा कोसळल्याने पोलिसांनी चेतन पाटील यांना कोल्हापूरमधून अटक केली. पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून पाटील यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा होत नाही, असे न्या. ए. एस. किलोर यांच्या एकलपीठाने म्हटले.
पाटील यांनी केवळ पुतळ्याच्या पायाचा स्ट्रक्चर स्टॅबिलिटी अहवाल सादर केला होता आणि पुतळा कोसळल्यानंतरही महाराजांचे पाय बांधकामाला जोडलेले होते, असे न्या पितळे यांनी म्हटले.