मुंबई - ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे केंद्रीय शिक्षण मंडळातून छत्रपतींचा इतिहास डावलला जात असल्याची टीका होत असतानाच राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचाइतिहास हद्दपार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्राची संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुरुवात केली. या मंडळाने यंदा पहिली ते चौथीच्या पुस्तकाची छपाई केली आहे. त्यातून ही बाब समोर आली. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर अनेक सरकार बदलली मात्र पुस्तकातील अभ्यासक्रमात छ.शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला होता. या प्रकारावर बोलण्यास आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
याबाबत बोलताना काँग्रेसचे माजी खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करणाऱ्या भाजपा-शिवसेनेचे सरकार हद्दपार करण्याची हीच ती वेळ आहे. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आता घालवुया सरकार हे एकच उद्दिष्ट ठेऊन काम कराव असं आवाहन त्यांनी केलं आहे.
तसेच या प्रकारावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, यांचं धाडसच कसं झालं? मी 'केंद्रीय शिक्षण मंडळाकडून' शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जावा म्हणून प्रयत्न करतोय, अनेकदा केंद्रीय शालेय शिक्षण मंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली आहे. देशभर महाराजांचं कर्तृत्व पोचावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रीयांची व सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असताना, महाराष्ट्रातच उलटी गंगा वाहावी? ही आगळीक अजिबात खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दात छत्रपती संभाजी महाराजांनी इशारा दिला आहे.