खरी शिवसेना कोणाची हा वाद अद्याप कायम असताना मुंबई महापालिका कोणता निर्णय घ्यावा या पेचात अडकलेली आहे. अशातच शिंदे गटाला बीकेसीतील ग्राऊंड दसरा मेळाव्यासाठी मिळालेले आहे. मात्र, दोन्ही गट शिवाजीपार्कसाठी आक्रमक असून पालिकेने सावध भूमिका घेतल्याचे समजते आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या गोरेगावमध्ये जाहीर सभा आहे. दसरा मेळाव्याआधीच ही सभा होत असल्याने ते या वादावर काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळाले असले तरी ठाकरे गटाला कोणतेही मैदान देण्यात आलेले नाही. यामुळे मोठ वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
शिंदे किंवा ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर परवानगी देऊ नये, असा पालिकेचा अभिप्राय असल्याचे समजते आहे. न्यायालयात खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे पालिकेने एका गटाला शिवाजी पार्क दिला तर नाराजी ओढवून घेतली जाऊ शकते. याबाबत विधी आणि न्याय विभाग दोन दिवसांत अहवाल देणार आहे. एकाला परवानगी दिली तर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता. यामुळे आपण निर्णय न घेतलेला बरा, अशी भूमिका या अभिप्रायामध्ये घेण्यात आल्याचे समजते आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
राऊतांचाही इशारा...शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. तर दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीति आखल्याचेही बोलले जात आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दसरा मेळाव्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला. संजय राऊत यांनी न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना दसरा मेळाव्याबाबत आक्रमक होत महापालिका आणि शिंदे-भाजप सरकारला थेट इशारा दिला आहे. शिनसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करणे ही आमची परंपरा आहे. परवानगी नाही दिली आतमध्ये घुसून दसरा मेळावा घेऊ, असा इशारा संजय राऊतांनी दिला. दुसरीकडे, शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसताना शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिकेने निर्णय घेण्यास उशीर लावला आणि हे प्रकरण आणखी ताणले गेल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.