मुंबई- शिवाजी पार्क पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी चौकशी केली असता, तिघे आत्मदहन करण्यासाठी शिवाजी पार्क येथे आल्याची माहिती समोर आली आहे. परभणीत वास्तव्याला असणा-या अखिलाबेगम नामक महिलेच्या पतीला परभणी पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. त्यानंतर कोठडीतच नव-याचा मृत्यू झाल्याचं महिलेला समजले.
परभणी नानलपेठ पोलीस ठाण्यात 25 डिसेंबर 2016मध्ये ३८ वर्षीय समशेर खान याला चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये खानचा मृत्यू झाला. पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तीन पोलिसांना अटक करण्यात आली होती. मात्र घरचा करता पुरुष गेल्याने खान कुटुंबीय रस्त्यावर आले. आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली होती. यासंदर्भात परभणी गुन्हे शाखेनं भादंवि 302,331,348,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक एम. एस. रौफ यांना अटक झाली आहे. तर इतर दोन कर्मचारी फरार आहेत. सदर महिला अखिलाबेगम समशेर खान (35), मुलगा मन्सूरखान समशेर खान(15), दीर यासिन खान शामिर खान(30) यांच्यासह शिवाजी पार्क येथे आत्मदहन करण्यासाठी आले होते.सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही, तसेच सरकारनं आमचा पुनर्वसन केलेलं नाही, असा आक्रोश करत तिने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तिन्ही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून एक रॉकेलची बॉटल व एक छोटा चाकू मिळाला असून ते सर्व सामान हस्तगत करण्यात आलं आहे.