माजलगाव (बीड) : ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर रंगमंचाचे साहित्य घेऊन मुंबईकडे परतणारा मिनी टेम्पो शनिवारी पहाटे शहरानजीकच्या पुलावरून कालव्यात पडला. यात बॅकस्टेज आर्टिस्ट जागीच ठार तर अन्य दोघे जखमी झाले.अनंत रमेश मोघे (३८ रा. दर्शन सोसायटी, म्हाडा कॉलनी, मुलुंड पूर्व, मुंबई) असे मृताचे नाव आहे. नाटकात यमाची भूमिका करणारे प्रवीणकुमार डाळींबकर (रा. भीमनगर, औरंगाबाद, सध्या मुक्काम मुंबई) आणि चालक मारोती किशनराव जाधव (रा. कोरेगाव, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हे जखमी झाले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ त्या दोघांनाही औरंगाबादला रवाना केले.‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील डोंगरकडा येथे होता. हा प्रयोग झाल्यानंतर रंगमंचाचे साहित्य मिनी टेम्पोमधून मुंबईला नेण्यात येत होते. टेम्पो पहाटे साडेपाचच्या सुमारास माजलगाव शहराजवळील नव्या मोंढ्यानजीक आल्यानंतर चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि टेम्पो थेट१४ फूट खोल असलेल्या कालव्यात कोसळून हा भीषण अपघात घडला. (वार्ताहर)
‘शिवाजी अंडरग्राउंड...’च्या टेम्पोला अपघात; १ ठार
By admin | Published: March 13, 2016 5:01 AM