संतोष मिठारी / कोल्हापूरई-बुक्स, ई-जर्नल्स, आॅडिओ बुक्स, ब्रेल प्रिंटिंग, आदी अद्ययावत तंत्रज्ञानावरील साधने असणारे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र (रिसोर्स सेंटर फॉर इन्क्लुसिव्ह एज्युकेशन) शिवाजी विद्यापीठात सुरू झाले आहे. या केंद्रामुळे दक्षिण महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षण घेण्याच्या प्रयत्नांना पाठबळ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) हे केंद्र साकारण्यात आले आहे.विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत सुमारे २५० दिव्यांग विद्यार्थी आहेत. त्यातील दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रेल लायब्ररी’ विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयात कार्यान्वित आहे. या ब्रेल लायब्ररीमध्ये जास्तीत जास्त अद्ययावत आणि अन्य दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता आवश्यक साधने, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू होते. त्याला ‘रुसा’ने १५ लाखांच्या निधीद्वारे मदतीचा हात दिला. शालेय ते महाविद्यालयीन पातळीवरील दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘समावेश शिक्षण’ केंद्राचे सदस्यत्व मोफत दिले जाणार आहे. त्यांना इंटरनेटचा वापर, संगणक हाताळण्याबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘रुसा’ने महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठासह शिवाजी कॉलेज अकोला, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) येथे या स्वरूपातील केंद्र साकारले आहे. शिवाय या केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारे केंद्र मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये साकारले आहे.
शिवाजी विद्यापीठात साकारले दिव्यांगांसाठी शिक्षण केंद्र
By admin | Published: April 24, 2017 3:14 AM