मुंबई - लोकसभा निवडणूक आटोपली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेली जुगलबंदी अद्याप कायम आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरुर मतदार संघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील शाब्दिक चकमक सुरूच आहे. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या टीकेला आढळराव पाटलांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
अजित पवार म्हणाले की, पराभवामुळे माझा चेहरा काळवंडला असून माझी मस्ती जिरली, हे मी वर्तमानपत्रात वाचले. परंतु, राज्यातील शेमडं पोरं पण सांगेल, कुणाची मस्ती जिरली. ज्या माणसाला स्वत:च्या मुलाला निवडून आणता आले नाही, अशा वाचाळवीराने माझ्यावर बोलणे विनोदच आहे, असं आढळराव पाटील म्हणाले.
माझा पराभव करण्याची हिंमत राष्ट्रवादीमध्ये कधीही नव्हती. याआधीत तीन वेळा राष्ट्रवादीला माझा पराभव कऱण्यात अपयश आले. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव राष्ट्रवादी किंवा अमोल कोल्हे यांच्यामुळे झाला नसून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेमुळे झाल्याचा दावा आढळराव पाटील यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे छळ, कपट हे देखील आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान माझे चुलते केंद्रीय कृषीमंत्री किंवा मोठे नेते नव्हते. या बाबाने त्यातून बाहेर पडावे. मागील दहा-बारा वर्षात अजित पवारने पक्षाच वाटोळं केलय. शिवसेनेचे देशपातळीवर १८ खासदार आहेत. माझ्या पक्षाला सन्मान आहे. मस्ती तर तुझी जिरली आहे. तुझ्यात हिंमत होती तर माझ्याविरुद्ध उभं रहायचं होत, अशी घणाघाती टीका आढळराव पाटलांनी केली.
मावळ मतदारसंघातून पार्थ पराभूत झाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन असं तू सांगितले होते. परंतु, तसं झालं नाही. केवळ बोलायचंच का, तसंही तुझ्या बोलण्याला महाराष्ट्र फारसं गांभीर्याने घेत नाही. पार्थच्या उमेदवारीवर शरद पवारांचं ऐकलं असतं तर परिस्थिती वेगळी असती. ज्या माणसाने स्वत:चा पक्ष फोडण्याची तयारी केली होती, अशा माणसाने आम्हाला मस्ती चढली असं सांगू नये, असंही आढळराव पाटील म्हणाले.