ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.५ - जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा बांधणारी कॅनडातील नोर ही कंपनीच मुंबईतील अरबी समुद्रातीन शिवस्मारक बांधणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी तीन कंपन्यांनी बोली लावली असली तरी नोरचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव बघता सरकारने शिवस्मारकाची जबाबदारी नोरकडे सोपवली आहे.
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून या स्मारकासाठी सुमारे १९०० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. या स्मारकामध्ये संग्रहालय, अॅम्फी थिएटर, डॉल्फिन अॅक्वेरियमचाही समावेश असून हे स्मारक मुंबईत येणा-या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरु शकते. या स्मारकाचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीसाठी तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी बोली लावली होती. या तिन्ही कंपन्यांनी भारतीय कंपन्यांच्या साथीने या कंत्राट प्रक्रियेत सहभाग घेतला होता. नोर पेटांकल या भारतीय कंपनीच्या मदतीने हे स्मारक तयार करेल. याच समितीने दुबईतील बुर्ज खलिफाची रचना केली असून जमिनीसोबतच खोल समुद्रात काम करण्याचा या कंपनीला प्रदीर्घ अनुभव आहे. यामुळेच शिवस्मारकाची धूरा नोर - पेंटाकल कंपनीकडे सोपवण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली.