धनाजी कांबळे - पुणे : वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाचा परिणाम याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. येत्या ११ वर्षांत पृथ्वीवर उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी वेगवेगळे प्रयत्न होत असताना काही गट आणि व्यक्ती देखील पर्यावरण रक्षणासाठी पुढे येत आहेत. असाच एक तरुण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवराय ते भीमराय अशी पर्यावरण जनजागरण सायकल यात्रा महाराष्ट्रभर काढत आहे.पर्यावरणप्रेमी शरद झरे वडगाव (ता. निलंगा) येथील पर्यावरणप्रेमी शरद झरे असे या तरुणाचे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला ही यात्रा निघणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १४ एप्रिल २०२० रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. रायगडपासून सुरुवात होवून अंबाजोगाई तालुक्यातील वानटाकळी इथे सायकल यात्रा संपणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे, अहमदनगर, बीड, अंबाजोगाई या जिल्ह्यांमध्ये ही सायकल यात्रा होणार आहे. त्यातून तापमान कमी करणे, पाणी वाचवणे, वृक्ष संवर्धन, कुऱ्हाड बंदी जनजागरण करण्यात येणार आहे. यात्रेत १ लाख वृक्षमित्र जोडण्याचा संकल्प झरे यांनी केला आहे. १५ वर्षीय ग्रेटाने पर्यावरण रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. याच धर्तीवर रायगडावरून या यात्रेचा प्रारंभ होणार असल्याचे उच्चशिक्षित झरे यांनी सांगितले.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे, अहमदनगर, बीड, अंबाजोगाई अशी ही सायकल यात्रा मार्गक्रमण करणार आहे. वानटाकळी येथील डोंगर पायथ्याशी वृक्षारोपण करून यात्रेचा समारोप होणार आहे. पर्यावरण प्रेमींनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन झरे यांनी केले आहे.
" शिवराय ते भीमराय " पर्यावरण जनजागरण सायकल यात्रा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 7:54 PM
तापमान कमी करणे, पाणी वाचवणे, वृक्ष संवर्धन, कुऱ्हाड बंदी जनजागरण
ठळक मुद्देआजपासून प्रारंभ : एक लाख वृक्ष मित्र जोडण्याचा संकल्प