लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त ॲलन गॅम्मेल यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त ब्रिटनकडून जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात देईल, अशी शक्यता आहे.यासंदर्भात आज अॕलन गॅम्मेल यांच्याशी मुंबईत अत्यंत समाधानकारक चर्चा झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी ब्रिटिश उच्चायुक्तालयातील राजकीय विभागविषयक उपप्रमुख इमोजेन स्टोन यादेखील उपस्थित होत्या. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य सरकार राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून मिळविण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवराज्याभिषेक ३५० व्या वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त मेमध्ये होणाऱ्या बैठकीत याबाबतची तपशिलवार प्रक्रिया निश्चित करण्यात येणार आहे.
शिवरायांची जगदंबा तलवार अन् वाघनखे परत मिळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2023 1:37 PM