मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात 'ब्रेक दि चेनच्या'अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत. (Shivbhojan thali will now be available in parcel in the Maharashtra, an important decision of the state government)
कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
(Maharashtra New Corona Guidelines: 'ब्रेक दि चेन'च्या आदेशात सुधारणा; आणखी आवश्यक सेवांचा समावेश)
सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नसून पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो त्यामुळे सर्वांनी राज्यसरकारला सहकार्य करावे असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले आहे.