मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून मुंबईतील अमली पदार्थ विरोधातील धडाकेबाज कारवाईमुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांची उपमहानिरीक्षक म्हणून बढती झाली आहे. मुळ केडर असलेल्या बिहार सरकारकडून त्यांच्या पदोन्नतीचे आदेश सोमवारी काढण्यात आले.
पोलीस दलातील खराखुरा "सिंघम" म्हणून ओळखले जाणारे लांडे गेल्या सव्वा तीन वर्षांपासून मुंबईत प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांच्यावर आता कोणती जबाबदारी सोपविली जाते?, हे पहाणॆ औत्सुक्याचे ठरणारे आहे.
शिवदीप लांडे हे मुळचे अकोला जिल्ह्यातील पारस गावचे आहेत. केन्द्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयपीएसच्या २००६ च्या तुकडीचे बिहार केडर मिळाले. त्याठिकाणी गुन्हेगारी व अवैध धंदे विरोधात धडाकेबाज कारवाई केल्याने त्यांचा उल्लेख 'मराठी सिंघम' म्हणून केला जात असे. लांडे हे २७ सप्टेंबर २०१७ मध्ये प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्र आले आहेत. मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात (एएनसी) जानेवारी २०१७ पासून उपायुक्त जबाबदारी पार सांभाळत आहेत.