“छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी काँग्रेसचे काम”: शिवेंद्रसिंहराजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 18:20 IST2025-03-16T18:17:04+5:302025-03-16T18:20:36+5:30
BJP Shivendrasinh Raje Bhosale News: पंतप्रधान मोदींनी छत्रपतींच्या इतिहासाची कायम दखल घेतली. उलट काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. एका बाजूला उपेक्षा करायची, दुसरीकडे बदनामी करायची हे कायम काँग्रेसच्या माध्यमातून झाले, अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी काँग्रेसचे काम”: शिवेंद्रसिंहराजे
BJP Shivendrasinh Raje Bhosale News: आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो. माझे वडीलही काँग्रेसमध्ये होते. महाराज मंत्री होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची कायम दखल घेतली. त्यांचा इतिहास, त्यातील घटनांची राष्ट्राशी जोडणी केली. आजवर महाराजांच्या दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या जतनासाठी त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहेत, असे कौतुकोद्गार काढताना छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले काँग्रेसवर सडकून टीका केली.
एका सभेत बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, काँग्रेस पक्ष राजकीय स्वार्थासाठी जाती जातींमध्ये तेढ निर्माण करतो आणि दुसरीकडे आपल्या विरोधकांना जातीयवादी म्हणतो. त्यांचा हा खोटारडेपणा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. अशा प्रकारे जातींमध्ये भांडणे लावत हा आणि त्याचे समविचारी पक्ष त्यांची राजकीय पोळी भाजून घेतात, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेल्या विधानानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी काँग्रेसचे काम
महाराष्ट्राचीच नाही, तर संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची या काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनीच सर्वाधिक बदनामी केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याकडे त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केले. त्यांचा इतिहास, पाऊलखुणा, गडकिल्ले या साऱ्यांकडे या पक्षाने मुद्दाम दुर्लक्ष केले. एका बाजूला महाराजांची उपेक्षा करायची आणि दुसरीकडे त्यांची बदनामी करत रहायचे, असे काम काँग्रेसच्या माध्यमातून सुरू असते आणि हे एक मोठे षड्यंत्र आहे. आमचा इतिहास, अस्मिता बदलण्याचा, पुसण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने याबाबत वेळीच सावध होत या अशा विचारांना थारा देऊ नये, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थितांना केले.
दरम्यान, महाराजांच्या दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या जतनासाठी पावले टाकण्याची कृती काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधीही झालेली नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ बदनामी आणि जातीजातींमध्ये भांडणे लावण्यासाठी केला, या शब्दांत शिवेंद्रसिंहराजे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.