“शिवेंद्रराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का सहन करता? सरकारमधून राजीनामा द्या”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 16:26 IST2025-03-16T16:25:17+5:302025-03-16T16:26:23+5:30
Congress Harshwardhan Sapkal Ratnagiri News: औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असून, महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा भाजपाचा डाव आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

“शिवेंद्रराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का सहन करता? सरकारमधून राजीनामा द्या”
Congress Harshwardhan Sapkal Ratnagiri News: औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकले, भावाचा खून केला, लहान भावाला वेडे ठरवले. या क्रूरकर्मा औरंगजेबाला मराठी माणसाने या मातीत गाडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आम्हाला प्रमाण आहे पण भाजपाला शिवाजी महाराजांचा इतिहास व शौर्य पुसून टाकायचे आहे म्हणून एक प्रवृत्ती औरंगजेबाची कबर उखडून टाका असे सांगत आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे, ते शौर्य पुसून टाकायचे षडयंत्र आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणीच करू नये पण भाजपा स्पॉन्सरच त्याचे उदातिकरण करत आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा महायुती सरकारवर निशाणा साधला. राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन देऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा महायुती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर सारखे हे टोळयांचे सरकार असून त्याची किंमत मात्र जनतेला चुकवावी लागत आहे, या शब्दांत सपकाळ यांनी टीकास्त्र सोडले.
शिवेंद्रराजे, छत्रपतींचा अपमान का सहन करता?
भाजपा ज्या कुशीत जन्मला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले यांना छळणारा विचारही तोच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याच विचाराने २०० वर्ष महाराजांची समाधी जनतेला कळू दिली नाही. महात्मा जोतीबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचा विचार व कार्य लोकांना कळू नये हा त्यामागचा डाव होता. भाजपा संविधान मानत नाही ते सरसंघचालक गोलवकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ मानते, याच पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे, ते शिवेंद्रराजेंनी वाचावे. सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले ते वाचावे. भाजपावाले छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा सातत्याने अपमान करत आहेत. अपमान करा व संरक्षण मिळवा, अपमान करा व पुरस्कार मिळवा हे काम भाजपा करत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकर व कोरटकरला संरक्षण दिले जाते त्या सरकारमध्ये शिवेंद्रराजे भोसले आहेत, आपण हा अपमान का सहन करता? असा प्रश्न विचारून महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारमधून राजीनामा द्यावा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
दरम्यान, देशाच्या व राज्याच्या राजकारणात आघाड्या, युतीची अपरिहार्य आहे, त्याची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे. युती, आघाडीमुळे कोकणात काँग्रेस निवडणुका लढू शकली नाही. इंडिया आघाडी वा मविआ म्हणून काम करत असताना काही मर्यादा व अडचणी येणे स्वाभाविक आहे. आता कोकणातही पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गपासून या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातही काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत, असेही सपकाळ म्हणाले.