Shivendraraje Vs Chhagan Bhujbal: गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन्ही समाजाच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच आता शिवेंद्रसिंह राजे यांनी छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करत, मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ वाढवू नये, असे आवाहन केले आहे.
छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊ नये. जाती-जातीत तेढ निर्माण करू नये. मराठा समाजाने आतापर्यंत कुणाचे हिसकावून मागितले नाही. कायद्यानुसार हक्काचा वाटा मागितला आहे. मराठा आरक्षण व समाजाविरोधात कुणीही बोलू नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या दौऱ्यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. यावेळी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
लोकशाहीतील योद्धे मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा
राज्यातील काहींनी या लढ्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये. दोन समाजात मतभेद निर्माण होतील, अशा प्रकारची वक्तव्ये करत समाज घटकांमध्ये दुफळी निर्माण करू नये. मराठा समाजाने आतापर्यंत कुणाच्या ताटतले मागितलेले नाही. हक्काचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षण लढ्याला सर्वांनी एकत्र येऊन बळ दिले पाहिजे. लोकशाहीतील योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
सद्यःस्थितीत आरक्षण निर्णायक टप्प्यावर आले
संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवेंद्रसिंहराजे यांनी या मागणीचे समर्थन केले आहे. मराठा आरक्षणासाठी सातारा जिल्हा कायमच अग्रभागी राहिला आहे. या लढ्याला बळ देत आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य हादरून सोडले आहे. झोपेतून जागे करण्याचे काम केले आहे. सद्यःस्थितीत आरक्षण निर्णायक टप्प्यावर आले आहे. समाजाने कायद्यात चौकटीत राहून काम केले पाहिजे. समाजातील गरीब लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.