मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेले शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मंत्रीपदाच्या लालसेने शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती. त्याला शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रक काढून चोख प्रत्युत्तर दिले.
आपल्याला मंत्रीपदाचा हव्यास असता तर कधीच राष्ट्रवादी पक्ष सोडला असता, असा टोला शिवेंद्रसिंह राजेंनी लावला. मागील १५-२० वर्षे आपण राष्ट्रवादीत काम केले. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपली कधीही आठवण झाली नाही. परंतु, पक्ष सोडला की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझ्या नावाचा जप सुरू केला आहे. अनेक वर्षे मंत्रीपदे भोगणारांनी लोकसभा निवडणुकीत स्वत:घरी बसून नवख्यांना पराभवाच्या तोंडी का दिले, असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी जयंत पाटील यांना केला.
यावेळी त्यांनी दिवंगत अभयसिंहराजे आणि शरद पवार यांच्या संबंधावर जयंत पाटील यांनी केलेल्या टिप्पणीचा समाचार घेतला. अभयसिंहराजे-शरद पवार यांचा उल्लेख करणारे जयंत पाटील हे भाऊसाहेब महाराजांना शेवटच्या पंचवार्षिक योजनेत मंत्रीपदापासून वंचित ठेवण्याचे राजकारण का झाले, याचं कारण सांगायचा विसरले. १५-२० वर्षे राष्ट्रवादी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. प्रामाणिकपणाचे मला काय फळ मिळाले. पक्षात असताना माझी कुणालाही आठवण झाली नाही. राष्ट्रवादीत ४० वर्षे राहिलेली कुटुंब पक्ष सोडत आहेत. हे का घडतयं यावर जयंत पाटील यांनी बोलावे असंही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.