नवी दिल्ली : अस्मितेचा मुद्दा झालेल्या मुंबईतील अरबी समुद्रात शिवछत्रपतींच्या विशाल स्मारकाच्या उभारणीतील सारेच अडथळे दूर झाले असून, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली. ही जागा राजभवनापासून एक किलोमीटर आणि मरीन ड्राइव्हपासून चार किलोमीटर लांब आहे. ३०९ फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिथे राहणार असून, पूर्वी ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सत्तेतील मित्र असून, त्यांच्यासाठी आपण ही आनंदाची बातमी जाहीर करत असल्याचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमक्ष सांगितले. जावडेकर म्हणाले, सात वर्षांपासून हा विषय रखडला होता. पर्यावरण खात्याने हरकत घेतली होती. पर्यावरण मंत्रालयाने अपवादात्मक बाब ठरविल्याने ते आक्षेप आता दूर झाले आहेत. स्मारकासाठी निवडलेली जागा खडकाळ आहे. सुमारे १८ हेक्टर म्हणजे ४५ एकर व्याप्तीचा खडक आहे. अशी जागा समुद्रात निवडताना समुद्राच्या भरतीचा विचार करावा लागतो. कारण सामान्य स्थितीत ती जागा योग्य वाटत असली तरीही समुद्राला भरती येते तेव्हा त्या जागेची स्थिती कशी असते, याचा विचार करावा लागतो. या जागेचा अभ्यास केला असून ती समुद्राला भरती आल्यावरही तीन ते चार मीटरवर राहते, असे पाहिले आहे. (विशेष प्रतिनिधी)
शिवस्मारक अरबी समुद्रातच
By admin | Published: December 05, 2014 4:00 AM