मुंबई : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून कोल्हापूरसाठी १ आॅक्टोबरपासून एसी शिवनेरी बस सुरू करण्यात आली. मात्र, या सेवेला पहिल्या दोन दिवसांत अवघ्या २९ प्रवाशांनीच प्रतिसाद दिला. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांपेक्षाही अधिक असलेले भाडे हेच या अल्प प्रतिसादामागचे कारण आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, याच मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या दोन निमआराम बसपैकी एक बस शिवनेरीला प्रतिसाद मिळावा, म्हणून बंद करण्यात आली. मुंबई ते पुणेव्यतिरिक्त कोल्हापूर मार्गावरही एसी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी प्रवाशांची मागणी होती. नवरात्रौत्सवात मुंबईतील अनेक भाविक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जातात. त्यामुळे एसटी महामंडळाने या मार्गावर एसी शिवनेरी बस १ आॅक्टोबरपासून सुरू केली. ही बस मुंबई सेंट्रल बस स्थानकातून रात्री ११ वाजता सुटून सकाळी ६ वाजता कोल्हापूरला, तर परतीच्या प्रवासासाठी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून रात्री ११ वाजता निघून सकाळी ६ वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचते. या सेवेचे भाडे प्रत्येकी १ हजार ४३ रुपये ठेवण्यात आले आहे. याच मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचे भाडे पाहता शिवनेरीचे भाडे अधिक आहे. १ आॅक्टोबरला मुंबई ते कोल्हापूरसाठी अवघे ६ प्रवासी मिळाले. तर परतीच्या मार्गासाठी त्याच दिवशी फक्त पाच प्रवाशांनी शिवनेरीचा पर्याय स्वीकारला. २ आॅक्टोबरला मुंबईतून सुटणाऱ्या बसमध्ये ७ प्रवासी तर परतीच्या वेळी ११ प्रवासी होते. शिवनेरी ४५ आसनी आहे. निदान २0 प्रवासी मिळाले, तर ना नफा ना तोटा स्वरूपात सेवा देता येते. परंतु हा आकडा पार करता आलेला नाही. दोन दिवसांत साधारण ३0 हजारांच्या जवळपास उत्पन्न एसटीला मिळाले आहे. ११ खासगी बस कंपन्यांची सेवा : मुंबई ते कोल्हापूर मार्गावर ११ खासगी बस कंपन्यांच्या सेवा आहेत. त्यातील पाच कंपन्या व्होल्वो, स्कॅनिया कंपनीच्या मल्टी एक्सेल बसेसही चालवतात. तरीही त्यांच्याकडून साधारण ८00 रुपये भाडे आकारले जाते. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येते.या आधीही प्रयोग : २0१४मध्ये मुंबई ते कोल्हापूर अशी स्लीपर बससेवा सुरू करण्यात आली होती. त्या वेळी या बसचे भाडे १,४00 रुपये होते. मात्र, त्याला कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर, ही सेवा बंद करण्यात आली.