सुशांत मोरे, मुंबईएसटी महामंडळाच्या प्रतिष्ठित अशा शिवनेरी सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तशी योजना आखण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत शिवनेरी गाड्यांची संख्या २00 पर्यंत नेण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या ११0 शिवनेरी गाड्या असून ठाणे-पुणे, मुंबई-पुणे, पुणे-औरंगाबाद मार्गावर या सेवा सुरू असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातील ११0 बसपैकी ४६ गाड्यांचा करार जुलै महिन्यात संपुष्टात येत असून, त्या बदल्यात नवीन गाड्या विकत घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळ आपल्या ताफ्यात ७0 नव्या शिवनेरी विकत घेत असून, या व्होल्वो आणि स्कॅनिया कंपनीच्या आहेत. ७0 शिवनेरी महामंडळाकडे आल्यानंतर एकूण १३४ शिवनेरींचा ताफा असणार असल्याचे खंदारे यांनी सांगितले. या गाड्यांना गेल्या काही वर्षांत चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यांची संख्या आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी योजना आखली असून त्यानुसार दोन वर्षांत ताफ्यात असलेल्या शिवनेरींची संख्या २00 पर्यंत नेण्याची योजना आहे. हे पाहता आणखी ६६ शिवनेरींची भर पडणार असल्याचे खंदारे म्हणाले. अन्य मार्गांवरही सुरू होणार शिवनेरीजादा येणाऱ्या शिवनेरी बसेस पाहता पुणे-कोल्हापूर, पुणे-सातारा, मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक या मार्गांवरही शिवनेरी सुरू करण्यासाठी आढावा घेतला जाईल, असे खंदारे म्हणाले. यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा यापुढे मिळणार आहे.
‘शिवनेरी’चा दोन वर्षांत विस्तार होणार
By admin | Published: June 18, 2015 2:39 AM