युवराज संभाजी महाराजांचा संतप्त सवाल : महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या विकासाकडे केंद्राचे दुर्लक्ष का?
संदीप जाधव - महाड
ज्या राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन मोठय़ा पराक्रमाने गड किल्ले जिंकले आणि साम्राज्य उभारले, या महाराष्ट्रातील त्या गड किल्ल्याच्या दुरवस्थेवर केंद्र शासनाचे पूर्णपणो दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी आपण रान पेटवणार असल्याचा इशारा युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिला.
किल्ले रायगडावर 341 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठय़ा उत्साहात आणि दिमाखदार पध्दतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवभक्तांना मार्गदर्शन करताना संभाजी महाराज बोलत होते. या सोहळय़ाला राज्यभरातून 5क् हजार पेक्षा अधिक शिवभक्तांनी हजेरी लावली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवघोषांनी रायगड दुमदुमून गेला होता तर शिवकालीन पेहरावातील मावळे व भगवेमय वातावरणामुळे शिवकाल अवतरल्याचा आभास यावेळी निर्माण झाला होता. संभाजी महाराज म्हणाले की, शिवराज्याभिषेक या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व राज्य शासनाला समजले नाही, ही दुर्दैव आहे. आज हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवभक्तांसाठी साधी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था शासन करु शकले नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. नुसत्या घोषणा करुन शिवप्रेम दाखवण्यापेक्षा शिवरायांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करुन दाखवा, असे आवाहनही संभाजी महाराजांनी सत्ताधा:यांना केले.
राजस्थान व अन्य राज्यातील गड किल्ले व पुरातन वास्तूचा विकास व सौंदर्यीकरणासाठी केंद्र शासन कोटय़वधीची उधळण करते. मग महाराष्ट्रातील गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार का कचरते, असा सवालही महाराजांनी केला. सोहळय़ाला जिल्हाधिकारी सुमंत भांगे, अमरावतीचे आ. बच्चू कडू, समितीचे अध्यक्ष इंद्रजित सावंत, शिवचरित्रकार शिवराज शेटय़े, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, सुरेंद्र जाधव, प्रांताधिकारी रवींद्र हजारे, यशवंत गोसावी आदी उपस्थित होते.
पंतप्रधानांवर स्तुतिसुमने
शिवराज्याभिषेक दिन सोहळय़ाप्रसंगी युवराज संभाजी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी हे रायगडावर येवून शिवरायांच्या नतमस्तक झाले होते. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद मोदी यांना लाभला म्हणूनच ते पंतप्रधान झाल्याचे युवराजांनी सांगून गड संवर्धनाच्या कामासाठी आपण मोदी यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मेघडंबरीमधील शिवरायांच्या पुतळय़ाला संभाजी महाराजांच्या हस्ते सुवर्ण मुद्रांचा अभिषेक घातला. यावेळी कोल्हापूरच्या गादीची तलवार उंचावून महाराजांनी शिवभक्तांना अभिवादन केले. त्यावेळी शिवघोषांनी रायगड दुमदुमून गेला होता. पालखी सोहळा, प्रति शिवाजी महाराजांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
वाहतूक कोंडी : गडाकडे येणा:या वाहनांमुळे सुमारे 5 ते 7 किमी लांब वाहनांची रांग लागली होती. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक पोलिसांचेही यावर नियंत्रण नसल्याने शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या वाहतूक कोंडीचा फटका जिल्हाधिका:यांनाही बसला त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी दोन तास उशिरा पोहचले.