जुन्नर : आदर्श राज्यकारभाराचे जगातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार. छत्रपती शिवराय जनतेचे राजे होते. सर्व जाती-धर्माला न्याय देणारे, रयतेवरील अन्याय दूर करणारे लोकशासन शिवरायांनी दिले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर काढले. छत्रपती शिवाजीमहाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी येथे शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मस्थळात पारंपरिक पाळणा हलवून शिवजन्म सोहळा झाला. या सोहळ्यासाठी शिवनेरीवर शिवप्रेमींनी गर्दी केली होती. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संभाजीराजे भोसले, आमदार विनायक मेटे, आमदार शरद सोनवणे, जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुंजीर, विठ्ठल जाधव, मारुती सातपुते, तालुकाध्यक्ष सुनील ढोबळे, माजी अध्यक्ष राजेंद्र बुट्टे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते. राज्यातील दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे संवर्धन होणे महत्त्वाचे आहे. राज्यातील ५ किल्ले शासनाने मॉडेल फोर्ट बनविण्याचे आवाहन करीत राज्यातील किल्ले संवर्धनासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करण्याचा मनोदय खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला. अखेर हेलिकॉप्टर किल्ले शिवनेरीवर उतरविले जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानने किल्ले शिवनेरी हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक असल्याने राज्य पुरातत्त्व विभागाने हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी नाकारण्याचे पत्र दिले होते. अखेरीस पुरातत्त्व विभागाने परवानगी दिल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर किल्ले शिवनेरीवर उतरविले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिगणाच्या स्वागताची संधी ठाकरवाडी तेजूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या ढोल लेझीम पथकाला मिळाली. यामुळे आदिवासी ठाकर समाजातील ही चिमणी पाखरे हरखून गेली होती. आमदार शरद सोनवणेंचे राजीनामानाट्य राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी आमदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारणार नसल्याचे सांगितले. हजारो शिवप्रेमी पायथ्याशी खोळंबलेशिवजयंती सोहळ्यासाठी शिवनेरीवर येणाऱ्या शिवभक्तांना सुरक्षेच्या कारणासाठी प्रवेशाचे पास काढण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे प्रवेशपास नसलेले हजारो शिवप्रेमी किल्ल्याच्या पायथ्याशी खोळंबून बसले होते. मुख्यमंत्र्यांचे प्रस्थान झाल्यानंतर शिवप्रेमींना गडावर सोडण्यात आले. किल्ले शिवनेरीवर शिवज्योत नेण्यासाठी शिवप्रेमी युवकांची रात्रीपासून मोठी गर्दी होती. त्यांचे स्वागत जुन्नर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.
शिवरायांचा राज्यकारभार जगात सर्वोत्तम
By admin | Published: February 20, 2017 3:19 AM