कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या रायगडावर काही दिवसांपूर्वी स्थानिक व्यक्तीला सापडलेला ‘सुवर्ण होन’ गायब झाला आहे. हा होन म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासातला महत्त्वाचा घटक आणि राष्ट्रीय संपत्ती आहे; त्यामुळे हा होन ज्यांनी गायब केला आहे, तो त्यांनी तातडीने पुरातत्व खात्याकडे जमा करावा, अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे.ते म्हणाले, रायगडावर अनेक व्यक्तींना ‘तांब्याच्या शिवराई’ मिळाल्या आहेत. पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात तर अनेक मौल्यवान गोष्टी मिळाल्या होत्या, अजूनही मिळत आहेत; मात्र आजवर शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी रायगडच्याच टांकसाळीमध्ये पडलेली ‘सुवर्ण होन’ अजूनपर्यंत मिळाले नव्हते. हे होन इतके दुर्मीळ आहेत, की आजही १0 ते १२ च होन उपलब्ध झाले आहेत. हा होन काही दिवसांपूर्वी एका स्थानिक मुलीला मिळाला आहे.शिवप्रेमींनी हा सुवर्ण होन पाहिला, हाताळाला त्याची छायाचित्रेही काढली. हा होन राष्ट्रीय ठेवा असल्याने तो पुरातत्व खात्याकडे जमा होणे गरजेचे होते; मात्र असे झाले नाही. त्या मुलीने हा होन कोणाला दिला की स्वत:कडेच ठेवला आहे? याचा शोध घेतला पाहिजे.
होन रायगडावरच शिवप्रेमींना पाहायला मिळाला पाहिजे, याबाबत खासदार संभाजीराजे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनीही हा ठेवा शासन जमा करावा, अशा सूचना केल्या आहेत. शिवाय हा होन ज्या व्यक्तीला मिळाला, त्या व्यक्तीला भरघोस बक्षीसही देण्याचेही जाहीर केले आहे. तरी संबंधितांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी केले आहे.