ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - नाशिकमधील शिवसेनेचे कार्यकर्ते गोरख खर्जुल यांनी एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांच्या कानाखाली मारल्याचा दावा केला आहे. ओवेसी संसदभवन परिसरात असताना मी त्यांच्यासमोर गेलो व त्यांना वादग्रस्त विधानांबद्दल जाब विचारला त्यांचे उत्तर न पटल्याने रागाच्या भरात मी त्यांच्या कानशिलात लगावली असे खर्जुल याने सांगितले.
या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण असल्याचाही त्याचा दावा आहे. गोरख खर्जुल हा नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा कार्यकर्ता आहे. दरम्यान खासदार ओवेसी यांना याबद्दल विचारले असता त्यांनी असा कोणताही प्रकार घडला नाही, आपणास कोणीही मारहाण केली नाही, असे म्हटले आहे.
शिवसैनिकांनी फोडल्या अणेंच्या गाडीच्या काचा!
मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी औरंगाबाद येथे आलेले राज्याचे माजी महाधिवक्ता व स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते अॅड. श्रीहरी अणे यांच्या मोटारीवर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यामुळे अॅड. अणे यांना या मेळाव्याचे उद्घाटन न करताच परत फिरावे लागले. मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आम्ही दहा फोडू : बाहेर असा सगळा प्रकार सुरूअसताना महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात मराठवाडा मुक्ती मोर्चाचा मेळावा सुरूहोता. जिल्ह्या- जिल्ह्यांतून कार्यकर्ते आलेले होते. त्यांनी आज एक गाडी फोडली; पण आम्ही दहा गाड्या फोडू व स्वतंत्र मराठवाडा मिळवून दाखवू, असा इशारा संयोजक प्रा. बाबा उगले यांनी दिला. मेळाव्यानंतर श्रीहरी अणे यांची पत्र परिषद होती. मेळाव्यापर्यंत ते पोहोचू न शकल्याने ही पत्र परिषदही झाली नाही.