ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 20- माजी आमदार वामनराव चटप, माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे आणि इतर विदर्भवादी नेत्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र विदर्भाच्या चर्चेसाठी बुधवारी अकोला येथे आयोजित परिषद शिवसैनिकांनी उधळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २0 एप्रिल रोजी अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात विदर्भ राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आजपर्यंत विदर्भावर झालेला अन्याय, रखडलेला विकास, विदर्भ विकासाकडे झालेले दुर्लक्ष, वाढलेली बेरोजगारी, शेतकºयांच्या आत्महत्या, शेती सिंचनाचा अनुशेष, विजेचा प्रश्न, दुष्काळ आदी विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सुरू करण्यात येणाºया आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आयोजित या परिषदेमध्ये माजी आमदार अॅड. वामनराव चटप, महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवादी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. ही परिषद सुरू असताना शिवसेनेचे निवासी उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा आणि शहरप्रमुख तरूण बगेरे यांच्यासह १0 ते १२ शिवसैनिक ‘जयभवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत सभागृहाजवळ आले. त्यांनी सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र आयोजकांनी सभागृहाचा दरवाजा बंद करून घेतल्याने त्यांना आत जाता आले नाही. या प्रकाराने परिषदस्थळी काही काळासाठी गोंधळ झाला होता. पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला; मात्र शिवसैनिक पोलिसांना जुमानत नव्हते. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीहल्ला करावा लागला.