बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होतेय. यातच आता आता शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनीदेखील मिटकरींवर निशाणा साधलाय. "अमोल मिटकरी हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेलं लेकरू आहे," अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे.
'त्यांच्या लग्नात काय झालं...'बीडमध्ये मीडियाशी संवाद साधताना विनायक मेटे म्हणाले की, "अमोल मिटकरी हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेलं लेकरू आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काय बोलावं, हे त्यांना कळत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने कन्यादानाचा अर्थ सांगितला, त्या पद्धतीने कन्यादान केलं जात नाही. त्यांच्या लग्नात काय झालं, त्यांना कोणता अर्थ सांगण्यात आला, हे माहीत नाही. मिटकरींचा होणारा निषेध योग्यच आहे," असा घणाघात मेटेंनी केला.
'सरकारी तिजोरीतून लूट'यावेळी मेटेंनी राज्य सरकारमधील मंत्र्यांचा खाजगी हॉस्पिटलमध्ये झालेला लाखो रुपयांच्या खर्चावर देखील टीका केली. "आरोग्याच्या नावाने राज्याच्या तिजोरीतून लूट झाली आहे. त्यावर सभागृहात चर्चा देखील होत नाही. भ्रष्टाचारी सरकार म्हणून लोकांच्या मनात आता सरकार उलथून टाकायचं सुरू आहे," असंही मेटे म्हणाले.