महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून वारंवार वादग्रस्त विधाने येत आहेत. सीमाप्रश्नी नेमलेले महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे बेळगाव दौरा करणार होते. परंतु या दौऱ्यावर लक्ष करत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असा इशारा बोम्मई यांनी दिला आहे. त्यामुळे कर्नाटकाची महाराष्ट्रावर कुरघोडी सुरूच आहे. याच दरम्यान आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र या सगळ्यावर गप्प का?, स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?" असा सवाल विचारला आहे. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का? महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे! स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?" असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"राग ह्या गोष्टीचा येतो की, खरंतर जो विषय चर्चेचा नाही त्यावर चर्चा करायला निघाले होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं" अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. बेळगावात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बोलत होते. ते म्हणाले की, सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाप्रश्न परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये. याबाबत कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना ही माहिती दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.