Shivsena Alliance-Sambhaji Brigade: आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती करण्याची घोषणा केली आहे. या अनपेक्षित युतीमुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. आज उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
नवीन युतीची घोषणायावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या नवीन युतीची घोषणा करत आहे. शिवसेना संभाजी ब्रिगेडच्या लढवय्या कार्यकर्त्यांचे स्वागत करते. देशात प्रादेशिक अस्मिता मारून टाकण्याचे काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा लढा सुरु आहे, हा जो निकाल लागेल त्यावर शिवसेनेचे भविष्यच नव्हे तर देशात लोकशाही राहिल की नाही हे ठरविणारा निकाल असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेशी संबंधीत नाहीत त्या व्यक्ती संविधान वाचविण्यासाठी एकत्र येऊया असे सांगत आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपलं रक्त एकच...उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संभाजी ब्रिगेडची विचारधारा शिवसेनेपेक्षा वेगळी आहे, त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आज आम्ही ज्या विचाराने सोबत आलो आहोत, तो विचार म्हणजे संविधान वाचवण्यासाठीचा विचार आहे. आपण शिवप्रेमी आहोत, आपल रक्त एकच आहे. एकत्र येऊन आपल्याला नवीन इतिहास घडवायचा आहे. दुहीच्या साप आमचा विश्वासघात करत आलाय, त्याला गाडू,' असंही ते म्हणाले.
भाजपला संघाची विचारधारा...उद्धव ठाकरे पुढे म्हणतात की, 'आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत युती केली होती. भाजपचा पितृपक्ष असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक विचार आहे, पण त्या संघाचाच विचार भाजप मानत नाही. संघाची विचारसरणी भाजपला मान्य आहे का? त्याप्रमाणे वागत आहेत का?? मोहन भागवतांनी गेल्या काही वर्षात जी मते मांडली आहेत, त्याप्रमाणे भाजप काम करत आहे का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे विचारधारा वगैरे आम्हाला विचारण्याऐवजी त्यांना विचारावी,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.