मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मुलाखतीनंतर शिवसेनेतील बंडखोर गट आणि भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंशी कट्टर राजकीय वैर असलेल्या नारायण राणे (BJP Narayan Rane) यांनीही या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे असल्याची टीका राणेंनी केली. यानंतर आता शिवसेनेने नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "नारायण राणे हे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात" अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Shivsena Ambadas Danve) यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. "नारायण राणे यांना फार गंभीरतेने घेण्याची गरज नाही. ते भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात" असा खोचक टोला त्यांनी राणेंना लगावला आहे. तसेच "बाळासाहेबांच्या विचाराने शिवसेना उभी केली. पण बाळासाहेबांच्या विचारांना छेद देऊन गद्दारी सुद्धा राणेंनी केली आहे. पक्ष हा शिवसेना प्रमुखांचा असताना तो स्वत:चा करण्याचा प्रयत्न त्यावेळी राणेंनी केलाच होता. पण शिवसैनिकांनी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तो प्रयत्न हाणून पाडला. म्हणून आजही या धक्क्यातून नारायण राणे सावरू शकलेले नाहीत" असं दानवे यांनी म्हटलं आहे.
"नारायण राणे जेवढे आमदार घेऊन गेले होते त्यांचं आता राजकीय अस्तित्व काय आहे?, त्यातले किती लोक आता नारायण राणे यांच्यासोबत आहेत? हा प्रश्न नारायण राणेंनी स्वत:लाच विचारला तर त्यांनाच त्यांचं उत्तर मिळेल" असं म्हणत अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना मराठी माणूस, हिंदुत्व आणि शिवसैनिक यांची आठवण होत आहे. त्यांची चिंता वाटत आहे. अडीच वर्ष सत्तेवर असताना त्यांना शिवसैनिक आठवला नाही. हिंदुत्त्व आठवलं नाही आणि मराठी माणूसही आठवलं नाही. आता मुलाखलीतून सविस्तर आपलं मत मांडत आहेत. सत्ता गेल्यानंतर तडफडणं म्हणतो त्या भावनेतून एक केविलवाणा प्रयत्न, व्यथा या मुलाखतीच्य माध्यमातून त्यांनी देशासमोर मांडली आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपद गेल्याने व्याकूळ झाले आहेत. मुख्यमंत्रिपद गेल्याने मला कुठलंही दु:ख नाही, असं ते म्हणताहेत. पण उद्धव ठाकरेंना मी फार जवळून ओळखतो. शिवसेनेत मी 39 वर्षे ओळखतो. अंगात खोटारडेपणा आहे, कपटीपणा आहे आणि दुष्ट बुद्धी आहे. अशी व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसून त्यांनी अडीच वर्षांत ना जनतेचं, ना शिवसैनिकांचं ना हिंदुत्वाचं कोणतही हीत वा कुठलंही काम केलं नाही. आजारपण आणि मातोश्री यातच त्यांचं कार्य, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.