शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून नव्या सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. याच दरम्यान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली. "सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय" असं म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Shivsena Ambadas Danve) यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी" असं म्हणत पलटवार केला आहे.
"गुलाबरावांची दोन महिन्यांपूर्वीची भाषणे तपासली पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं सामना हे वृत्तपत्रं आहे. त्यांच्या विचारावर चालणारं हे वृत्तपत्रं आहे. सामनातून जे सांगितलं ते सत्यच आहे. भाजपाने महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत. सामना हे बाळासाहेबांच्या विचारांचं दैनिक आहे. त्यामुळे सामनावर टीका करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत" अशी बोचरी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
आशिष शेलार यांनी शिवसेना साफ करण्याची भाषा करू नये. ही कीड उपटून टाकण्याआधी गावितांवर जे भाजपाने आरोप केले होते, ती कीड शेलारांनी आधी दूर केली पाहिजे. जे खासदार शिंदे गटात आले, त्यांच्यावर भाजपाने आरोप केले ती कीड दूर केली पाहिजे. सोमय्यांनी शिंदे गटातील आमदारांवर लावलेल्या आरोपांचं काय झालं? ही कीड शेलारांनी दूर केलीय का? असा दानवे यांनी केला.
"सामना जर कागदाचा लगदा आहे तर त्याची दखल का घेता? मीडिया त्यावर बातम्या का करते? तुम्ही सामनाला का सीरियसली घेता? सोडून द्या. त्यावर बोलूच नका. लगदा असेल तर हा लगदा उलटा घुसतो तेव्हा कळेल त्यांना" असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.