पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसांनंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायायीन कोठडीत गेल्या १०० दिवसांपासून होते. जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. त्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. याच दरम्यान आता संजय राऊतांना जामीन मिळताच ठाकरे गटाने इशारा दिला आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी संजय राऊतांना जामीन मिळताच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. पिंजऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वाघाचा फोटो दानवेंनी ट्विट केला आहे. "कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे" असं म्हणत इशारा दिला आहे. "माननीय न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जमीन मंजूर केला आहे. न्यायालयाचे मनःपूर्वक आभार."
"विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या सांभाळाव्यात. आणि हो, कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे" असं अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे तसेच SanjayRautisback आणि shivsenauddhavbalasahebthackeray हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
"टायगर इज बॅक"; राऊतांना जामीन मिळाल्यावर अंधारेंची पहिली प्रतिक्रिया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संजय राऊत यांना जामीन मिळाल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "टायगर इज बॅक" असं सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. संजय राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने लेखी उत्तर सादर केले होते.