मुंबई/बुलडाणा : जिल्ह्यातील आमदारांच्या मागे सध्या काही ना काही शुक्लकाष्ट लागले असून चार जून रोजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर हे आकाशवाणी आमदार निवासातील लिप्टमध्ये अडकल्याची घटना ताजी असतानाच चक्क आमदारांसाठी राखीव असलेल्या बोगीतच घुसून चोरट्यांनी आ. डॉ. संजय रायमुलकर आणि आ. राहूल बोंद्रे तथा आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्याकडील साहित्य लुटल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ऐरवी विकास कामे किंवा अन्य मुद्द्यांची चर्चेत असले जिल्ह्यातील हे तिनही आमदार या घटनांमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. या दोन्ही घटना २४ जून रोजी अनुक्रमे विदर्भ एक्सप्रेस आणि देवगिरी एक्सप्रेसमध्ये कल्याण रेल्वे स्थानकानजीक घडल्या. सध्या अधिवेशन सुरू असल्याने चिखलीचे आ. राहूल बोंद्रे हे विदर्भ एक्सप्रेसने मलकापूरवरून मुंबईसाठी रविवारी सकाळी निघाले होते. दरम्यान, पहाटे कल्याण ते ठाणे दरम्यान ते पोहोचले असता आमदारांसाठी राखीव असलेल्या बोगीमध्येच चोरटा शिरला व त्याने आ. बोंद्रे यांची पत्नी वृषाली बोंद्रे यांची पर्स हिसकावत पलायन केले. पर्समधील २५ हजार रुपये रोख काही महत्त्वाची मुळ कागदपत्रे यात होती. ही बाब समजताच आ. राहूल बोंद्रे यांनी थेट रेल्वेतून उडीमारून चोरट्याचा पाठलाग केला. त्याला त्यांनी पकडलेही पण चोरट्याने झटका देऊन पुन्हा पलायन केले. दरम्यानच्याच काळात कल्याण स्टेशनवरून त्यांची रेल्वे निघाल्याने त्यांनी पुन्हा रेल्वे गाठली. दुसरीकडे याच कालावधीत मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर आणि डॉ. शशिकांत खेडेकर हे जालना येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईसाठी निघाले होते. तेही कल्याण-ठाणे दरम्यान असताना डॉ. रायमुलकर यांच्या खिशातील रोख दहा हजार रुपये आणि ५६ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. यात त्यांचे डिजीटल आयकार्डही चोरट्यांनी लंपास केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रात्री गोळी घेऊन ते झोपले असता चोरट्याने हा हात साफ केला. सीएसटी स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. दुसरीकडे आ. रायमुलकर व आ. खेडेकर हे एकाच बोगीत जवळ जवळ असताना आ. खेडेकर यांचीही बॅग चोरट्यांनी ब्लेडने कापल्याचे लक्षात आले. सुदैवाने त्यातून काही चोरीला गेले नाही. परंतू चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधीलही साहित्य चोरण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे दोन्ही आमदार प्रवास करत असलेली बोगी ही अधिवेशन सुरु असल्याने आमदारांसाठी राखीव असते. त्यामुळे आमदारांसाठी राखीव असलेल्या बोगीत चोर कसे काय आले असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला आहे.मात्र, आमदारांना आलेला अनुभूव नवीन असला, तरीही सामान्य रेल्वे प्रवाश्यांना हा रोजेच आहे.
तिन्ही आमदारांची पोलिस ठाण्यात भेट
बुलडाणा जिल्ह्यातील तिन्ही आमदार या प्रकरणाची तक्रार सीएसटी लोहमार्ग पोलिस ठाण्यात देण्यासाठी गेले असता तेथे तिघांचीही भेट झाली, तेव्हा तिघांसोबतही सारखाच प्रकार घडल्याचे समोर आले. पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही सायंकाळी या प्रकाराबाबत कल्याण येथील पोलिस अनभिज्ञ होते, असे आ. राहूल बोंद्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आमदारांसाठी आरक्षीत असलेल्या बोगीतच असा प्रकार होत असले तर सर्वसामान्याचे काय? असा प्रश्नीही त्यांनी उपस्थित केला.
आ. खेडेकरही आडकले होते लिप्टमध्ये
जून महिन्यातच चार जून रोजी सिंदखेड राजाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर हे आकाशवाणी आमदार निवासातील लिप्टमध्ये तब्बर अर्धास अडकले होते. स्वयंचलित असलेली ही लिप्ट अचानक बंद पडल्याने अखेर तिचे दार तोडून आ. खेडेकर व त्यांच्या सहकाºयांना बाहेर काढावे लागले होते.