मुंबई- माजी मंत्री अर्जुन खोतकर (Shivsena Arjun Khotkar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (BJP Raosaheb Danave) देखील उपस्थित होते. जालना जिल्ह्यात खोतकर आणि दानवे हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र यावेळी एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीदरम्यान दोघेही उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे. यानंतर आता रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "खोतकर आणि माझे मतभेद मिटले, आता आम्ही एकत्र काम करणार" असं म्हटलं आहे.
रावसाहेब दानवे यांनी "कोणी कुणाचा कायमचा शत्रू नाही, जालन्याच्या राजकारणाची चावी भाजपाच्याच हाती राहणार" असं देखील सांगितलं आहे. तसेच "खोतकर आणि आमच्यातले वाद आता मिटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आम्ही दोघांनी एकमेकांना साखर भरवली. आता शिवसेना आणि भाजपा एकत्र असल्यामुळे आम्ही एकत्र काम करू" असं म्हटलं आहे. यासोबतच "राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र नाही, शत्रू नाही. क्षणिक काही गोष्टी घडतात आणि त्यातून मतभदे वाढत असतात" असं देखील दानवे यांनी सांगितलं.
"जालन्याच्या राजकारणाची चावी भाजपाच्याच हाती राहणार आहे. जालना मतदारसंघ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे ही जागा कायम भाजपाकडेच राहणार. आमच्यासाठी पक्षवरिष्ठांचा निर्णय महत्वाचा. त्यामुळे माझ्या जागी पक्षाने दुसरा जरी उमेदवार दिला तरी हरकत नाही. पण ही जागा भाजपाकडेच राहणार" असंही रावसाहेब दानवे म्हणाले. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
शिवसेनेचे अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील?; संजय राऊतांचं मोठं विधान
"जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे" असं संजय राऊत यांनी स्पष्टच म्हटलं आहे. तसेच "दोन दिवसांपूर्वीच माझं अर्जुन खोतकर यांच्याशी बोलणं झालं. यावेळी त्यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ते म्हणाले होते. दानवेंबाबत त्यांनी आणखी काही शब्द वापरले होते. ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं सांगितलं आहे.