मुंबई - शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आता एकीकडे आदित्य ठाकरे राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा आणि गाठीभेटींचा धडाकाच लावला आहे. अनेक वर्षांनंतर ते शिवसेना शाखेतही जाताना दिसून ये आहेत. उद्धव ठाकरेंनी रविवारी शिवडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना भाजपा आणि बंडखोर नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. तसेच, शिवसेना फोडण्याचा नाही, तर संपविण्याचा हा डाव असल्याचंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून भाषण करताना भाजपावर जोरदार प्रहार केला.
शिवसेना फोडण्याचा नाही, तर हा संपविण्याचा डाव आहे. मात्र, शिवसेना पुरुन उरेल आणि संपविणाऱ्यांना पाताळात गाडेल, अशा शब्दांत भाजपावर हल्लाबोल केला. याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (Shivsena Arvind Sawant) यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. एका छोट्या शिवसैनिकाचा हा व्हिडीओ असून तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अरविंद सावंत यांनी शिवसेना... नाते जिव्हाळ्याचे, स्नेहाचे... पिढ्यापिढ्यांचे...! असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.
व्हिडिओमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवण्यात य़ेत आहे. ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली आहे. या गर्दीमध्ये एक छोटा शिवसैनिक मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. वडिलांच्या खांद्यावर बसलेला हा लहान मुलगा उद्धव ठाकरेंच्या भाषणावर जोरजोरात टाळ्या वाजवताना, जयजयकार करताना दिसत आहे. अरविंद सावंत यांनी आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर अकांऊटलाही हा व्हिडीओ टॅग केला असून सध्या व्हिडिओतल्या चिमुकल्याची चर्चा रंगली आहे.
"शिवसेना संपली असं म्हणणाऱ्यांनी जरा एकदा इथं पाहावं. उपस्थित असलेले कार्यकर्ते माझी ताकद आहेत. 'वर्षा'वरुन निघालो असलो तरी मातोश्री परतल्यानंतर मला माझी खरी शक्ती मिळाली आहे. शिवसैनिक ही माझी खरी ताकद आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, अरविंद सावंत यांना किशोरी पेडणेकरांनी गणपती बाप्पाची, मंगलमूर्ती भेट म्हणून दिली. गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे. मी गणरायाकडे साकडं घालतोय की तुझ्या आगमनाआधी हे संकट आणि आरिष्ट्य मोडून शिवसेनेचा भगवा पुन्हा महाराष्ट्रावर फडकू देत. हिंदुस्थानावर फडकू देत, आता खरा भगवा कोणता हे दाखवण्याची वेळ आली आहे", असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.