उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचा शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात निवडणूक आयोगाने गटांचे नाव व चिन्हांबाबत निर्णय दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे राहील. ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले. याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (Shivsena Arvind Sawant) यांनी एक ट्विट केलं आहे.
अरविंद सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेले एक व्यंगचित्र शेअर केले आहे. सावंत यांनी ट्विट केलेले हे व्यंगचित्र 1984 ते 1985 च्या काळात काढल्याचे नमूद केले आहे. "हे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी 1984/85 मध्ये काढलेले बोलके व्यंगचित्र… #मशाल" असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. व्यंगचित्रामध्ये भाजपावर निशाणा साधत कमळ शिवसेने हाती घेतले त्यावेळी सुखावला होता, आता मात्र शिवसेने हातात मशाल घेतली असून तिची धग सहन करा असा इशारा दिला आहे.
ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना देखील अरविंद सावंत यांनी टॅग केलं असून मशाल हा हॅशटॅग देखील वापरला आहे. ठाकरे गटाची पहिली पसंती त्रिशूल होते, तर दुसरे उगवता सूर्य होते. याच चिन्हांवर शिंदे गटानेही दावा केला होता. यामुळे हे दोन्ही चिन्ह त्यांना मिळाले नाही. तिसरे चिन्ह धगधगती मशाल होते. हे चिन्हसुद्धा यापूर्वी दुसऱ्या समता पक्षाला दिले होते. परंतु या पक्षाचे अस्तित्व नसल्यामुळे आता ते मुक्त चिन्हांमध्ये आल्याने ते ठाकरे गटाला दिले आहे. परंतु हे चिन्ह केवळ अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरते आहे. आयोगासमोर सुरू असलेल्या निवाड्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले आहे.
धार्मिक कारणांनी चिन्ह नाकारले
ठाकरे गटाने त्रिशूल व शिंदे गटाने त्रिशूल व गदा या चिन्हांवर दावा केला होता. परंतु या चिन्हांना धार्मिक संदर्भ असल्याने हे चिन्ह प्रदान केले नाही, असे आयाेगाने स्पष्ट केले. उगवता सूर्य हे चिन्ह तामिळनाडूतील डीएमकेचे असल्याने ते चिन्ह नाकारण्यात आले. यामुळे शिंदे गटाची तिन्ही चिन्हे आयोगाने नाकारली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"